breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट

उगवत्या भाईमंडळींचे उद्योग, पोलिसांची डोकेदुखी

पिंपरी-चिंचवड शहरात तोडफोडीच्या घटना आणि वाहने जाळण्याचे उद्योग सुरू असताना बेकायदेशीरपणे शहरात येणारे गावठी कट्टे आणि पिस्तुलांचे रॅकेट पोलिसांची डोकेदुखी वाढवणारे आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

गोली मार भेजे मे, के भेजा शोर करता है, अशी मस्तीत जगणारी गुन्हेगारी प्रवृत्तीची भाईमंडळी आपण सिनेमात पाहतो. त्या भाईगिरीचे भलतेच आकर्षण असणारा एक मोठा वर्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या गल्लीबोळात दिसून येतो. या उगवत्या भाईमंडळींचा बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि गावठी कट्टे बाळगण्याचा उद्योग सर्वश्रुत आहे. छुप्या मार्गाने पिस्तूल आणि गावठी कट्टे शहरात दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वी अशाप्रकारच्या शेकडो गुन्हय़ांची नोंद पोलीस दफ्तरी आहे. गेल्या काही दिवसांत याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या हत्यारांचा वापर विविध गुन्हय़ांत होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. यापुढेही तसेच होत राहणार, यात कोणतीही शंका नाही. ही हत्यारे येण्यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे. अधूनमधून पोलीस कारवाई करतात. बरीच प्रकरणे पोलिसांनी उजेडात आणली आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे. मात्र, हत्यारे येण्याचे प्रमाण व त्यातील गुन्हेगार जेरबंद होण्याचे प्रमाण यात बरीच तफावत दिसते. दहा जण पकडणार, तेव्हा एक दाखवणार आणि उर्वरित प्रकरणात तोडपाणी होणार, असे अर्थकारण यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडूनच दिली जाते. अशा प्रकारे एखाद्याकडे हत्यार सापडल्यानंतर ते प्रकरण मिटवण्याचा दर पाहता यात किती गोळा होतात व त्यातून किती जणांचे उखळ पांढरे होते, याचे मोजमाप नाही. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशातून ही हत्यारे बेमालूमपणे शहरात आणली जातात. तेथे कमी किमतीत मिळणारी ही हत्यारे येथे चांगल्या भावाने खपतात, त्यामुळेच या व्यवसायाची चलती आहे. ही हत्यारे अनेक गुन्हय़ांत वापरली जात असल्याने पोलिसांच्या दृष्टीने ती डोकेदुखीच आहे. हत्यारे बाळगण्याच्या गुन्हय़ात आतापर्यंत अनेक जण सापडले आहेत. गरीब व झोपडपट्टीत राहणारी मुले त्यात प्राधान्याने दिसून येतात. काही दिवसांपूर्वी एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी आरोपी म्हणून सापडला होता.

कमी वेळेत जास्त पैसा मिळवणे तसेच या क्षेत्रातील आकर्षण यामागे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. धमकावण्यासाठी तसेच वेगवेगळय़ा गुन्हय़ांसाठी पिस्तूल व कट्टय़ांचा वापर केला जातो. असे गुन्हे करणाऱ्यांची साखळीच आहे, त्याचा शोध वेळोवेळी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. गेल्या एकाच आठवडय़ात दोन वेगवेगळय़ा प्रकरणांत तीन पिस्तूल व बारा काडतुसे आढळून आले आहेत. या पद्धतीचे गुन्हे कमी होण्याऐवजी त्यात वाढ होताना दिसते, ही मोठी चिंतेची बाब आहे. मात्र, याकडे पाहिजे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही, ही शोकांतिका आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button