breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तंत्रविज्ञानाचे विद्यार्थी ड्रोननिर्मितीत गुंतणार

हवाई दलातर्फे प्रथमच १०० कोटींची स्पर्धा; विद्यापीठांना आवाहन

भारतीय हवाई दलातर्फे पहिल्यांदाच ड्रोननिर्मिती करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी १०० कोटींची तरतूद आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र पाठवून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले असून, विजेत्यांना १० लाखांच्या पारितोषिकासह हवाई दलाच्या बेस रिपेअर डेपोच्या साहाय्याने १०० कोटींच्या ड्रोनच्या सहउत्पादनाची संधी मिळणार आहे.

दुसऱ्या महायुद्धात मोलाची कामगिरी केलेले वैमानिक एअर कमोडोर मेहेर सिंह यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली आहे. म्हणूनच मेहेर बाबा ड्रोन स्पर्धा असे त्याचे नाव आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यांत होणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना १०० किमी जाऊ शकणाऱ्या आणि १ किलोचे सामान वाहू शकणाऱ्या ड्रोनची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी ड्रोनच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष निर्मितीचे आव्हान पेलावे लागणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. स्पर्धेची अधिक माहिती www.airforce.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्पर्धा तीन टप्प्यांत

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात १६ डिसेंबपर्यंत विद्यार्थ्यांना संकल्पना सादर करावी लागेल. दुसऱ्या टप्प्यात ३३०० मीटर उंचीवरून जीपीएससह १० किमीपर्यंतचे अंतर गाठू शकणाऱ्या दहा ड्रोनची निर्मिती करावी लागेल, तर तिसऱ्या टप्प्यात ५० किमी जाऊ शकणारे ५० ड्रोन तयार करावे लागतील. ड्रोनचा निर्मितीखर्च म्हणून पहिल्या टप्प्यासाठी २५ लाख, दुसऱ्या टप्प्यासाठी १० कोटी दिले जातील. स्पर्धेत तीन विजेते निवडले जातील. विजेत्यांना हवाई दलाच्या बेस रिपेअर डेपो (बीआरडी) येथे सहउत्पादन करण्याच्या संधीसह प्रत्येकी १० लाख रुपये मिळतील. २६ जुलैला कारगिल विजय दिनाच्या औचित्याने विजेत्यांची घोषणा केली जाईल, असे एआयसीटीईच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

कल्पनेला चालना..

लष्करी देखरेखीपासून शेतीवर कीटकनाशकांची फवारणी करण्यापर्यंत विविध क्षेत्रांत ड्रोनचा वापर वाढू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर, हवाई दलातर्फे पहिल्यांदाच अशी खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कल्पनांना चालना मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button