breaking-newsराष्ट्रिय
गाझियाबादमध्ये 5 मजली इमारत कोसळून 1 ठार
गाझियाबाद: गाझियाबादमध्ये बांधकाम सुरु असलेली एक 5 मजली इमारत कोसळून एक जण ठार झाला, तर अन्य काही जण जखमी झाले. ही इमारत मसूरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश नगर भागात होती. इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदत, बचाव कार्याला सुरुवात झाली, असे पोलिसांनी सांगितले.
आतापर्यंत ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे आणि एका व्यक्तीला वाचवण्यात यश आले आहे, असे “एनडीआरएफ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. काही मजूरांनाही वाचवण्यात आले असून उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले आहेत की नाही, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच ग्रेटर नोएडामध्ये सहा मजली आणि आणखी एक पाच मजली इमारती कोसळल्या होत्या. शाहबेरी गावात शेजारी शेजारी असलेल्या या दोन इमारती कोसळल्याने 9 जण ठार झाले होते. त्यामध्ये एका लहान बालकाचा आणि दोन महिलांचाही समावेश होता.