breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार शरद पवार यांच्यावर बोलण्याएवढी पडळकरांची लायकी नाही

– माजी आमदार विलास लांडे यांचा टोला

पिंपरी ! प्रतिनिधी

मागच्या दाराने आमदार झालेले गोपीचंद पडळकर यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री व जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ज्या पडळकरांना लोकांनी निवडणुकीत नाकारले. ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना स्वतःची उंची मोजणे गरजेचे आहे. पडळकरांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा गोपीचंद पडळकरांना पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेऊ देणार नसल्याचा खणखणीत इशारा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.

खासदार शरद पवार यांच्यावर पडळकरांनी टिप्पणी केल्याने माजी आमदार विलास लांडे संतप्त झाल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळाले.

माजी आमदार लांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होते. मात्र पडळकर यांनी आदल्या रात्री जाऊन चुकीच्या पद्धतीने उदघाटन करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत लोकांनी नाकारल्याने पडळकरांचे डोके ठिकाणावर नसल्याचा आरोप माजी आमदार लांडे यांनी केला. खासदार शरद पवारांवर पडळकरांनी जेजुरीत अश्लाघ्य भाषेत टीका केली.

त्यावर माजी आमदार लांडे यांनी पडळकरांवर हल्लाबोल करताना पिंपरी चिंचवडमध्ये येऊनच दाखवा, असे आव्हान दिले आहे. तसेच बारामतीत डिपॉझिट जप्त झालेल्या पडळकरांचा बोलवता धनी कोण आहे व कोणाच्या जीवावर ते एवढ्या उड्या मारताहेत, हे सगळ्यांना माहित आहे, असे लांडे म्हणाले. ज्या पक्षाचे ते आमदार आहेत त्या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार शरद पवारांना गुरु मानतात. हे तरी पडळकरांनी ध्यानात घ्यावे, असा खोचक सल्ला माजी आमदार लांडे यांनी दिला.
पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्यावर अशोभनीय टीका करताना आपली पात्रता काय? हे पहिल्यांदा पडळकरांनी पहायला हवे होते,असा टोला लांडे यांनी लगावला.

एकही निवडणूक न जिंकलेल्यांची एकही निवडणूक न हरलेल्यांवरची ही टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. त्यामुळे हिंमत असेल तर पडळकरांनी पिंपरी चिंचवड मध्ये पाय ठेऊन दाखवावा. त्यांची पळता भुई थोडी करू, असा इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button