breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खासगी बसचे मनमानी भाडे दिले, पण तक्रार केली नाही!

तक्रार दिल्यास कारवाई करण्याची आरटीओची भूमिका

पुणे : दिवाळीच्या सुटीमध्ये शहरातील काही खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मनमानी पद्धतीने भाडेआकारणी केल्याचे प्रवासी सांगत असले, तरी या बाबत कुणीच अधिकृतपणे तक्रार नोंदविली नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. दिवाळीसाठी विशेष पथकाची निर्मिती करून तपासणी करून जादा भाडेआकारणी होत नसल्याची खातरजमाही करण्यात आल्याचा दावा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे. नियमापेक्षा जादा भाडे आकारल्याची तक्रार आल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, अशी भूमिका आरटीओकडून घेण्यात आली आहे.

दिवाळी किंवा उन्हाळी सुटीच्या दिवसामध्ये खासगी वाहतूकदार प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसुली करत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने राज्य शासनाने मागील वर्षी या बाबत धोरणात्मक भूमिका घेतली. त्यानुसार खासगी प्रवासी बससाठी कमाल भाडेदराची निश्चिती करण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिल्यापेक्षा अधिकची भाडेआकारणी झाल्यास संबंधित वाहतूकदारावर कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबंधिताचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचे प्रयोजनही करण्यात आले आहे. निश्चित केल्यानुसार भाडेदराची आकारणी होते की नाही, हे पाहण्याची आणि संबंधितावर कारवाईची जबाबदारी आरटीओवर सोपविण्यात आली आहे.

यंदाच्या दिवाळीच्या सुटय़ा लागताच खासगी वाहतूकदारांकडे प्रवाशांची गर्दी वाढली होती. पुण्यातून राज्यभरात सुमारे आठशे गाडय़ा दररोज सोडण्यात येत होत्या. प्रवाशांची निकड पाहता काही वाहतूकदारांनी अवाच्या सवा भाडेआकारणी केली. नेहमीप्रमाणे यंदाही पुण्यातून विदर्भाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. नागपूरसाठी शयनयान प्रकारातील गाडीसाठी इतर वेळेला १६०० ते १८०० रुपये भाडेआकारणी केली जाते.

यंदा पुणे- नागपूरसाठी काही वाहतूकदारांनी प्रवाशांकडून चार हजार रुपये उकळले. या बाबत प्रत्यक्ष माहिती घेतल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली होती. मात्र, आरटीओच्या म्हणण्यानुसार याच काळात त्यांच्या पथकानेही तपासणी केली असता, असे काहीच दिसून आले नाही.

शिवाजीनगर, संगमवाडी, कोथरूड, स्वारगेट, कात्रज, खराडी बायपास आदी ठिकाणी आरटीओच्या विशेष पथकाने भेटी देऊन प्रवाशांना आकारल्या जाणाऱ्या भाडेदज्राबाबत पडताळणी केली. त्यात जादा भाडे आकारणी होत नसल्याची खातरजमा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे प्रवाशांनीही आरटीओकडे जादा भाडेआकारणीची एकही तक्रार दाखल केली नाही. कोणत्याही तक्रारीची नोंद नसल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले.

तक्रार कुठे, कशी करावी?

खासगी प्रवासी वाहतूकदाराकडून शासनाने दिलेल्या सूत्रापेक्षा अधिकची भाडेआकारणी होत असल्यास नागरिकांनी प्रवासाच्या तपशिलासह पुणे आरटीओ कार्यालयाकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. नागरिक आपली तक्रार  [email protected] या ई-मेलद्वारेही पाठवू शकतात. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या बाबत कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

खासगी बसची भाडेनिश्चिती कशी

संपूर्ण बससाठी प्रतिकिलोमीटर कमाल भाडे आकारणीचे सूत्र शासनाने ठरवून दिले आहे. एसटीच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडय़ापेक्षा खासगी संपूर्ण बसचे प्रतिकिलोमीटर भाडे ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, अशा पद्धतीने भाडेनिश्चिती आहे. उदाहरणार्थ- शयनयान बससाठी एसटीचे प्रतिबस प्रतिकिलोमीटर भाडे ६४.४० रुपये होते. खासगी बससाठी ते ९६.६० रुपयांवर जाऊ नये. व्होल्व्होसारख्या ४३ आसनांच्या गाडय़ांसाठी प्रतिबस प्रतिकिलोमीटर भाडे १६९.८६ रुपयांच्या आतच हवे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button