breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

आझम पानसरेंच्या भूमिकेमुळे सुलक्षणा धर ‘डार्क हॉर्स’; आमदार अण्णा बनसोडेंना ‘टेन्शन’

आगामी विधानसभा निवडणुकीत समीकरण बदलणार : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मोठी रणनिती

पिंपरी : विशेष प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे ‘कट्टर समर्थक’ असलेले पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची डोकेदुखी वाढणार आहे. शहरातील मातब्बर नेते आणि माजी महापौर आझम पानसरे यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे बनसोडे यांना २०२४ ची निवडणूक सोपी नाही, असे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका आणि पुतण्यामध्ये पडलेल्या उभ्या फुटीच्या पार्श्वभूमीवर-पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिल्याने पिंपरी विधानसभेची समीकरणे आता बदलली आहेत.

आझम पानसरे यांचे प्रभावक्षेत्र म्हणून पिंपरी मतदारसंघाकडे पाहिले जाते. २०१९ मध्ये या मतदार संघातून शरद पवार यांनी सुलक्षणा शिलवंत-धर यांना तिकीट दिले होते. मात्र, ऐनेवळी अण्णा बनसोडे यांची उमेदवारी ‘कम्फर्म’ करण्यात आली. शिलवंत यांना माघार घ्यावी लागली. सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेवून शिलवंत यांनी शरद पवार आणि पुरोगामी विचारांसोबत राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, त्यांचे निकटवर्ती असलेले तुषार कामठे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी संधी मिळाली. शरद पवार गटाची सूत्रे कामठे आणि शिलवंत यांच्याकडे एकवटली असून, नव्या दमाची फळी निर्माण करुन भाजपासह महायुतीला तगडे आव्हान निर्माण करण्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नेते पानसरे हे सध्या राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी आदरयुक्त दरारा व वलय त्यांचे अद्यापही कायम आहे. पानसरे यांचा पाठिंबा किंवा अदृश्य हात जरी पाठीमागे असला तरी लोकसभा अथवा विधानसभा लढविणाऱ्यांसाठी ते मोठे बळ समजले जाते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे यांच्या अनुक्रमे पहिल्या खासदारकीला व भोसरीतून अपक्ष विधानसभा निवडणुकीला त्याची प्रचिती शहराने अनुभवली होती. तसेच २०१७ मध्ये पानसरेंनी भाजपाला साथ दिल्याने महापालिकेवर भाजपाचा झेंडा देखील फडकणे सोपे झाले होते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पानसरे यांची ताकद सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी राहिली, तर शिलवंत यांना आगामी पिंपरी विधानसभा निवडणूक सोपी होणार आहे.

बनसोडेंना अजित पवार प्रेम भोवणार…?

पिंपरी विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. या मतदार संघामध्ये भाजपाविरोधी मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फायदा होतो, असे मानले जाते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुतीद्वारे विद्यमान आमदार म्हणून अण्णा बनसोडे यांची उमेदवारी निश्चित होवू शकते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. आमदार बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कायम साथ दिली आहे. किंबहुना ‘‘दादा बोले… तैसा अण्णा चाले…’’ अशीच स्थिती आहे. पण, मतदार संघ हा भाजपा समविचारी पक्षांसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे अजित पवारांवरिल प्रेम आमदार बनसोडे यांना भोवणार, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button