breaking-newsक्रिडा

क्रिकेटवरील निष्ठेमुळेच पुनरागमन करू शकलो- महंमद शमी

बर्मिंगहॅम: भारताचा अनुभवी आणि गुणवान वेगवान गोलंदाज महंमद शमी या वर्षाच्या सुरुवातीपासून क्रिकेटमुळे कमी आणि त्याच्या खाजगी आयुष्यातील प्रकरणांमुळे जास्त गाजत आहे. सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे शमीला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले होते. प्रसार माध्यमांनी त्याच्या खासगी जीवनाला सातत्याने लक्ष्य केले होते.

मात्र इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात तीन फलंदाजांना बाद करताना शमीने यशस्वी पुनरागमन केले आहे. या पुनरागमनाचे श्रेय शमीने क्रिकेटप्रती असलेल्या निष्ठेला दिले आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआय.टीव्ही या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शमी म्हणाला की, गेल्या काही काळापासून मी घरगुती समस्यांनी त्रस्त होतो त्यामुळे माझ्या खेळात खूपच फरक पडला होता. माझी गोलंदाजी नीट होत नव्हती, दुखापतींनीही डोके वर काढले होते. त्यामुळे मी खूप त्रस्त झालो होतो. मात्र, क्रिकेटबद्दल माझ्या मनात असलेले प्रेम मला शांत बसू देत नव्हते. त्यामुळे मी माझ्या खेळावर जास्त लक्ष केंद्रित केले आणि त्याचाच फायदा मला या सामन्यात झाला.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना महंमद शमीच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसा आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप करताना पोलिसांमध्ये त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर त्याला अपघात देखील झाला होता, ज्यामुळे तो जायबंदी झाला होता. हे सारे कमी पडल्याप्रमाणेच तो यो-यो चाचणीतही नापास झाला होता व परिणामी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते.

त्यामुळे त्याचे क्रिकेट करीयर संपले की काय, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला होता. मात्र, इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करताना यो-यो चाचणीही पार करून संघातील आपले स्थान परत मिळवले. इतकेच नव्हे तर पहिल्या सामन्यातील पहिल्याच डावांत इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद करताना शमीने यशस्वी पुनरागमन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button