breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कोविड 19’ खाजगी रुग्णालयातील बिलांची होणार तपासणी

पिंपरी चिंचवडमधील खाजगी रुग्णालयांचे होणार सर्व्हेक्षण

कोरोना बाधितकडून बील जादा घेणा-यांवर कारवाईची शक्यता

विकास शिंदे

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांवर महापालिकेसह विविध खासगी रुग्णालयात उपचार केले जातात. मात्र, खाजगी रुग्णालयात बाधितांवरील उपचारात हेळसांड होत असून त्याच्याकडून बिलेही जादा आकारली जावू लागली आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णावर उपचार करणा-या सर्व रुग्णालयांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले. तसेच कोरोना बाधित रुग्णांकडून किती बिले आकारली त्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण कोरोना बाधित चार हजार 288 रुग्ण आहेत. त्यामध्ये कोरोना मुक्त दोन हजार 543 एवढे आहेत. तर सध्या महापालिका रुग्णालयात एक हजार 674 रुग्णांवर उपचार सुरु आहे. शहरात अनलाॅक झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होवून बाधित रुग्णांची संख्येत प्रचंड वाढ होत आहे. बाधित रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयासह विविध खासगी रुग्णालयात उपचार केले जातात. मात्र, खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड होवून योग्य निदान केले जात नाही. तसेच बाधितांकडून वारेमाप बिले आकारली जात आहेत. याबाबत आयुक्तांकडे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णावर केलेल्या उपचारासाठी घेण्यात आलेल्या बिलांची तपासणी होणे आवश्यक आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या खासगी रुग्णालयांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणीत वीस अधिकारी कर्मचा-यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. त्यानूसार महापालिका हद्दीतील 30 आणि त्यापेक्षा अधिक बेड असलेल्या रुग्णालय किती, त्या रुग्णालयांची नावे, संबंधित स्टाफची पदनिहाय सर्व माहिती, मोबाईल नंबर, तेथील कोरोना बाधित पाॅझिटीव्ह रुग्ण संख्या किती, संशयित रुग्णा संख्या, एकूण बेड संख्या, रुग्णांवरील उपचाराबाबत नियोजन सर्व माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर कामकाजाच्या नियंत्रित अधिकारी म्हणून मुख्य लेखा परिक्षक अमोद कुंभोजकर यांची नियुक्ती केली असून त्याना सहायक म्हणून मनोज सेठिया यांना जबाबदारी दिली आहे. सदरील माहिती संकलित करण्यास सोळा अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नियंत्रणात व सुचनेनूसार दररोज अहवाल संबंधित अधिका-यांकडे देण्याच्या सुचना केलेल्या आहेत. तसेच शहरातील खासगी रुग्णालयाकडून कोरोना बाधिताकडून उपचारास आकारण्यात आलेल्या बिलाबाबत अहवाल आयुक्तांकडे सादर करावा, असा आदेश दिला आहे.

दरम्यान, प्रस्तुत आदेशानूसार संबंधित अधिकारी कर्मचा-यांना कामकाज न केल्यास आपत्ती व्यवस्थापन नियम 2005 अन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच हजेरीचा तपशिल मुख्य लेखापरिक्षकांनी संबंधितांच्या मूळ आस्थापनाकडे पाठवावा, असेही आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button