breaking-newsमहाराष्ट्र

पंढरीत वारकऱ्यांसाठी नवे भक्तनिवास, जिल्ह्यातील पहिली पर्यावरणपूरक इमारत

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अत्याधुनिक सोयी सुविधेसह भक्त निवास बांधले आहे. विशेष म्हणजे आयजीबीसी या संस्थेने या इमारतीला मानाकन दिले असून जिल्ह्यातील ही पहिली “ग्रीन बिल्डींग” ठरली आहे. या भक्त निवासामध्ये सुमारे १२०० भाविक मुक्काम करू शकतील, अशी उभारणी केली आहे. यासह इमारतीमधील सांडपाणी, पावसाचे पाणी यावर प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच धार्मिक, आरोग्यदायी तसेच देशी वृक्ष लागवड केली आहेत. या भक्त निवासाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व्हे नंबर ५९ इथे दर्शनाला आलेल्या भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास बांधण्याची संकल्पना तत्कालीन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी मांडली होती. पुढे भाविकांच्या आणि मंदिर समितीला उत्पन्न वाढीचा विचार करून बदल करण्यात आला. शासनाकडून समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यावर डॉ. भोसले यांनी त्याला आधुनिक “टच” दिला. विशेष म्हणजे या इमारतीमधील कोणतेही घाण, सांडपाणी, बाहेर न जाता त्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन केले. त्यानुसार पावसाचे वाया जाणारे पाणी, सांडपाणी या वर प्रक्रिया करून हे पाणी इमारतीतील वृक्षांना देण्यात येणार आहे.

तसेच इथे जमा झालेला कचरा खोलीच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून खत निर्मितीही केली जाणार आहे. यासाठी एक अत्याधुनिक यंत्र इमारतीमध्ये बसविण्यात आले आहे. त्याचबरोबरीने इमारतीमध्ये आग किवा अन्य दुर्घटना झाल्यास ती घटना आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री बसविण्यात आली आहे. आगीची घटना घडली तर काही सेंकदात ऑक्सिजन आणि पाण्याचा फवारा सुरु होईल. तसेच ज्या ठिकाणी आग लागली. त्या ठिकाणी “हाय प्रेशर” पाणीपुरवठा केला जाणार आहे.

या भक्त निवासामध्ये तुळस, झेंडू, लाल फुल, २७ नक्षत्रांची २७ वृक्षे आदी धार्मिक तसेच आरोग्यदायी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नक्षत्रांची लागवड करताना जे नक्षत्र सुरु आहे. त्या नक्षत्रावर वृक्ष लावले आहेत. या भक्त निवासमध्ये ८ लोकांना एकत्र राहता येईल. असे ७८ हॉल तयार करण्यात आले आहेत. तसेच पाच लोकांना एकत्र राहता येईल असे ६३ हॉल तयार करण्यात आले आहेत. २ बेड असलेल्या ८१ रूम, दोन बेडचे व्हीआयपी वातानुकूलित ५१ रूम्स, व्हीआयपी ८ सूट, व्हीव्हीआयपी ६ सूट अशी राहण्याची सोय करण्यात आली आहे.

मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना तसेच इथे येऊन काही महिने राहणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी वन बीएचके फ्लॅट देखील तयार करण्यात आले आहेत. एकाच वेळेला अनेक लोक जेवण करतील असे सुसज्ज शाकाहारी रेस्तराँ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी २२०० चौरस मीटरचे लॉन व १५ बाय ०९ मीटरचा स्टेज देखील तयार करण्यात आला आहे. भक्तनिवासच्या दर्शनी बाजूस ४३ गाळे देखील बांधण्यात आले आहेत. तसेच २७३ चार चाकी वाहने व २०० दुचाकी बसतील अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. तसेच सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जाणार आहे. अशा या आधुनिक आणि भाविकांसाठी बांधलेल्या भक्त निवासाचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.

वारकरी सांप्रदाय आणि आधुनिकतेचा संगम : डॉ.भोसले
या भक्त निवासाचा मुळ उद्देश येथे येणाऱ्या वारकऱ्यांना निवासासाठी आहे. इथे आलेल्यांना त्यांच्या गरजेनुसार खोली, हॉल, स्वतंत्र फ्लॅट बांधले आहेत. तसेच मंदिर समितीला या माध्यमातून उत्पन्न मिळावे म्हणून लॉन, गाळे बांधले आहेत. तसेच या इमारतीमधील विंगला संताची नावे देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. या शिवाय वारकरी सांप्रदायातील विविध संत मंडळींच्या महात्म्य भित्तीचित्रातून मांडले आहे. या इमारतीला “ग्रीन बिल्डींग” मानाकन प्राप्त झाले आहे, असे मंदिर समितीचे अध्यक्ष भोसले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button