breaking-newsक्रिडा

कोलकातासमोर आज राजस्थानचे तगडे आव्हान

  • दोन्ही संघांसाठी विजय निर्णायक ठरणार 

कोलकाता – आयपीएल स्पर्धेतील साखळी फेरीचा अखेरचा टप्पा सुरू झाला असून त्यातील आज होणाऱ्या निर्णायक सामन्यात ईडन गार्डन्सवर राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध लढत रंगणार आहे. प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याकरिता दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ पाचव्या आणि कोलकाता चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे एक पराजय कुठल्याही संघाचे प्ले-ऑफचे गणित बिघडवू शकतो.

आयपीएलच्या अकराव्या हंगामात आपल्या समतोल खेळाने प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत बाद फेरीच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांदरम्यान होणारा हा सामना चुरशीचा होण्याची निश्‍चिती असून दोन्ही संघांनी आपापल्या अखेरच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सुरुवातीपासून अनेक चढ उतार पहायला मिळाले आहेत, ज्यात कोलकाता, मुंबई, राजस्थान, बंगळुरूचे संघ सुरुवातीच्या सत्रात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करू शकले नसल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. मात्र राजस्थान आणि कोलकाता या संघांनी यशस्वी पुनरागमन करत बाद फेरीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे.

चालू मोसमात कोलकाताने आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले आहेत तर त्यांना 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे 12 गुणांसह ते चौथ्या स्थानी आहेत. तर दुसरीकडे राजस्थानच्या संघानेही आपल्या 12 सामन्यांमधील 6 सामन्यात विजय मिळवला आहे तर 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचेही 12 गुण झाले असून निव्वळ धावगतीत पिछाडीवर असल्याकारणाने ते पाचव्या स्थानी आहेत.
चालू हंगामात कोलकाताचा संघ पूर्णपणे सुनील नारायण, ख्रिस लिन आणि दिनेश कार्तिक यांच्या फलंदाजीवर अवलंबून राहिला आहे, तर राजस्थानच्या संघाला जोस बटलरने लागोपाठ पाचवे अर्धशतक साजरे करत संघाला सावरले असून गत दोन्ही सामन्यात त्याने त्यांना एकहाती विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थानचा संघ प्रभावी ठरण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी यंदाच्या मोसमात आतापर्यंत चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले असून अचूक माऱ्याच्या साहाय्याने प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ- 
कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राना, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरॉन डेलपोर्ट, जावोन सिरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी व टॉम करन.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजू सॅमसन, बेन स्टोक्‍स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डीआर्की शॉर्ट, दुश्‍मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस. मिथुन, जयदेव उनाडकत, बेन लाफलिन, प्रशांत चोप्रा, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, जतिन सक्‍सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्‍रिच क्‍लासेन, झहीर खान आणि राहुल त्रिपाठी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button