breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

किनारा मार्गालगत जॉगिंग, सायकल ट्रॅक

दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांमध्ये झटपट पोहोचता यावे या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळीदरम्यानच्या परिसरात तब्बल ९६ लाख ८७ हजार ५१० चौरस फूट भरावक्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यापैकी ७८ टक्के भूभागावर विविध नागरी सुविधा साकारण्यात येणार आहेत. त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाटय़गृह, लहान मुलांसाठी उद्याने व खेळाची मैदाने, प्रसाधनगृहे, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत पदपथ आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाअंतर्गत १,६२५ वाहन क्षमता असलेली तीन भूमिगत वाहनतळे उभारण्याचाही पालिकेचा मानस आहे.

मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी  तब्बल ९६ लाख ८७ हजार ५१० चौरस फूट परिसरात भरावक्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी २२ टक्के म्हणजे २१ लाख ५२ हजार ७८० चौरस फूट क्षेत्रफळावर सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. उर्वरित ७८ टक्के म्हणजे ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांवर नागरी सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी दिली.सागरी किनारा रस्त्यालगत स्वतंत्र ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ उभारण्याचे प्रस्तावित आहे. या दोन्ही ट्रॅकची लांबी प्रत्येकी ६.२० कि.मी. असेल. मरिन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाष मार्ग व वरळी समुद्रकिनाऱ्याजवळील खान अब्दुल गफार खान मार्ग या दोन्ही ठिकाणी बसण्यासाठी कट्टय़ांसह सागरी पदपथ बांधण्यात आले आहेत. मुंबईतील सर्वात मोठा सागरी पदपथ विकसित करण्यात येणार आहेत.

मुंबईमध्ये सुमारे ७५० उद्याने व ३१८ खेळांची मैदाने आहेत. सागरी किनारा रस्त्याच्या निमित्ताने उपलब्ध होणाऱ्या भराव क्षेत्रातही पालिकेतर्फे उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. यात लहान मुलांसाठी खेळसाधनांचा समावेश आहे. किनारा मार्गालगत १४ ठिकाणी बस थांबे उभारण्यात येणार आहेत. थांब्यांपर्यंत भूमिगत पदपथही बांधण्यात येणार आहेत. प्रकल्पाला परवानगी देताना तेथे ‘फुलपाखरू उद्यान’ उभारण्याची अट केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने घातली होती. त्यासाठी पालिकेकडून १० कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे.

भूमिगत वाहनतळ

मार्गालगत महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा ही धार्मिक स्थळे, तसेच ‘अमर सन्स उद्यान’, वरळी समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळे आहेत. अनेक जण आपल्या खासगी वाहनाने तेथे जातात. त्यांच्यासाठी महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दग्र्याजवळ एक, अमर सन्स उद्यानाजवळ दुसरे आणि वरळी डेअरी, वरळी समुद्रकिनाऱ्याजवळ तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. त्यांत एकूण १,६२५ वाहने उभी करता येतील. विशेष म्हणजे ही तिन्ही वाहनतळे भूमिगत असतील. त्यांच्या छतांवर उद्यान अथवा खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button