breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या संघटनेचा अमृतमहोत्सव

कामगारांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यापासून शासनाला मोफत घरे देणे भाग पाडण्यापर्यंत आणि फुले दाम्पत्यांच्या विचारांवर आधारित नाटकाची निर्मिती करण्यापासून विविध विषयांवरील जनजागृतीपर्यंत अनेक विषय हाताळणाऱ्या आणि कामगारांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभ्या राहणारी पुणे महानगरपालिका कामगार युनियन सोमवारी (१० डिसेंबर) अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करत आहे.

कॉ. विनायक उर्फ भाऊ गणेश फाटक यांनी अ‍ॅड. कुलकर्णी, चिंतामणी लाटकर, वसंतराव नाईक, सुशीला कुलकर्णी या सहकाऱ्यांबरोबर श्रमिक अधिनियम १९२६ नुसार १० डिसेंबर १९४३ रोजी पुणे म्युनिसिपल कामगार युनियन स्थापन केली. रोजंदारी कायम करावी, पगारवाढ मिळावी या मागणीसाठी कामगारांनी त्याकाळी संप केला. हा संप दडपण्याचे प्रकार झाले. मात्र, कामगार एकजुटीने ठाम राहिले. पुण्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत न्यायमूर्ती लोकूर यांच्याकडे जबाबदारी दिली. त्यानुसार रोजंदारी कायम करणे, महिलांना सहा आठवडय़ाची प्रसूती रजा, रविवारची अर्धा दिवस रजा, ३७.५ टक्के भत्ता अशा मागण्या मान्य करत १३ एप्रिल १९४६ या दिवशी कामगारांना पहिले यश मिळाले.

युनियनला २२ ऑगस्ट १९९५ रोजी मान्यताप्राप्त दर्जा मिळाला. युनियनला भाऊ फाटक, अप्पासाहेब भोसले, चंदूनाथा चव्हाण, प्रभाकर गोखले, लीलाताई भोसले, अशोक मनोहर, ताराबाई सोनवणे, भिवा एडके, सखुबाई वायदंडे, डी. एस. देशपांडे अशा लढाऊ कामगार नेत्यांची परंपरा लाभली आहे. ही युनियन मुक्ता मनोहर, उदय भट या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. कामगारांच्या वर्गणीतून श्रमिक भवन या नावाने युनियनचे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले आहे, अशी माहिती युनियनचे चिटणीस वैजीनाथ गायकवाड यांनी दिली.

सन २००७ मध्ये मुक्ता मनोहर यांनी नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या सहकार्याने चतुर्थ श्रेणी कामगारांची अवस्था, कामाचे स्वरूप, जीवनशैली यांबाबत ‘कचराकोंडी’ नावाने लघुपट तयार करून कामगारांचे जीवनमान जनतेसमोर आणले. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा करणाऱ्या सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर मोफत घर देण्याबाबत निर्णय घेतला.

या निर्णयाची अंमलबजावणी करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आणि अशा प्रकारचा संघर्ष करून कामगारांना मोफत घर मिळवून देणारी पुणे महानगरपालिका कामगार युनियन ही पहिली कामगार युनियन ठरली. आतापर्यंत ५६३ सफाई कामगारांना मोफत घरांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित गो. पु. देशपांडे लिखित सत्यशोधक नाटकाची निर्मिती करून एक वेगळा आदर्श युनियनने निर्माण केला. या नाटकातील सर्व कलाकार सफाई कामगार होते.

युनियनच्या स्थापनेपासून आजतागायत कितीतरी युनियन स्थापन झाल्या आणि लयाला गेल्या. मात्र, पुणे महापालिका कामगार युनियन कामगारांच्या एकजुटीने टिकून आहे, अशी भावना मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button