breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कणखर नेतृत्वाअभावी चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर

  • गावकी- भावकी आणि मर्जीच्या राजकारणाचा ‘फटका’
  • पक्षवाढीची धुरा आली नवीन कार्यकर्त्यांच्या खांद्यावर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 2022 ची निवडणूक अवघ्या दोन वर्षांवर येऊ ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्ष बदलला. कार्यकारणीतही अमुलाग्र बदल करणार आहेत. तरी, प्रतिस्पर्धक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत मात्र अगदीच थंड वातावरण आहे. ‘’गावकी- भावकी आणि मर्जीचे राजकारण’’ अशा खुळचट भूमिकेमुळे शहरात पक्षाची वाताहत झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत असून विद्यमान पदाधिका-यांच्या प्रभावी नेतृत्वाअभावी चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी ‘बॅकफुटवर’ गेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या भूमिकेमुळे 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती गेली. त्यानंतर पक्षाला अक्षरषः घरघर लागली असून ज्यांनी पक्ष संघटनेतील मोठमोठी पदे घेतली. तेच आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपसोबत मॅनेज होताना दिसत आहेत. निविदा न भरता थेट पध्दतीने कामे मिळवण्यासाठी सत्ताधा-यांपुढे लोटांगण घातले जात आहे. याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील पदाधिका-यांना मोकळे राण मिळाले आहे. गावकी भावकीच्या राजकारणाचा धागा पकडून अर्थपूर्ण संबंध जोपासले जात आहेत. पदाधिका-यांनी स्वतःच्या हितासाठी पातळी सोडून वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी ठेवल्याने पक्ष रसातळाला पोहोचला आहे.

चिंचवड विधानसभेत भरमसाठ लोकांना पदे दिली आहेत. मात्र, पक्षाला वर आणणारे एकही प्रभावी नेतृत्व अद्याप तयार झाले नाही. याचा प्रत्यय पक्षाला लोकसभा निवडणुकीत आलेलाच आहे. विधानसभा निवडणुकीतही तगडा उमेदवार नसल्यामुळे पक्षाला प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद करण्याचे नाट्य रचावे लागले. एकंदरीत पक्षाकडे आशादायी नेतृत्व नसल्यामुळे चिंचवड विधानसभेत पक्षाची पुरती वाट लागली आहे. विशेष बाब म्हणजे पक्षातील सर्वात मोठी पदे ही चिंचवड विधानसभेत दिली आहेत. मात्र, त्याचा पक्षाला तसुभरही फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांनी कोणाकडे पाहून काम करायचे, असा प्रश्न भेडसावत आहे. ही बाब पक्षाच्या वरीष्ठ पातळीच्या नेत्यांकडून गांभिर्याने घेतली जात नसल्यामुळे पक्षाच्या –हासाचे द्योतक ठरत आहे. परिणामी, चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस ‘बॅकफुट’वर गेली आहे. त्यामुळे पक्षवाढीची धुरा आता नवीन कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आली आहे.

निष्ठावंत पदाधिका-यांची ‘कर्तबगारी’

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 नगरसेवक आहेत. त्यातील काहींजण चिंचवड विधानसभेतील रहिवासी आहेत. विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी युवक अध्यक्ष तथा स्थायी समितीचे सदस्य मयूर कलाटे, विद्यमान युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी संघटनेचे सुनिल गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रदेश युवकचे सरचिटणीस संदीप चिंचवडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष शाम जगताप यांच्याकडे प्रमुख जबाबदारी आहे. परंतु, वास्तविक परिस्थिती पाहता सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामावर यातील एकाचाही प्रभावी विरोध होताना दिसत नाही. पक्षाच्या एकाही आंदोलनात यातील सर्वजण उपस्थित नसतात. यांची कर्तबगारी पाहून आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता आणण्यासाठी यातील कोणाला शहराध्यक्ष पद द्यावे, हे कार्यकर्त्यांनीच दादांना सांगावे, असा निष्कर्ष राजकीय जाणकारांनी मांडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button