breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा निर्णय

कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे आणि सोसायटय़ांमधील ओला कचरा सोसायटय़ांमध्येच जिरविणे बंधनकारक करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोसायटय़ा, गृहप्रकल्पांच्या आवारात राबविण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांना चालना देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी ४५ प्रकारचे तंत्रज्ञान निश्चित करण्यात आले आहे.

शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विविध उपाययोजनांतर्गत घरे, सोसायटय़ा, शाळा, हॉटेल्स तसेच विविध संस्था आणि कंपन्यांच्या हद्दीमध्ये ओला कचरा कसा जिरविला जाईल, याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचा वेळोवेळी आढावाही घेण्यात येत आहे. प्रक्रिया प्रकल्पांना चालना मिळावी, यासाठी गांडूळखत प्रकल्प, पाणी पुनर्भरण योजना, लहान-मोठय़ा क्षमतेचे प्रक्रिया प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटय़ा, गृहप्रकल्पांना मिळकत करामध्ये पाच ते दहा टक्क्य़ांची सवलत दिली जाते. मात्र बहुतांश सोसायटय़ांमधील हे प्रकल्प बंद अवस्थेत असल्याचे सातत्याने पुढे आले होते. प्रकल्प बंद असलेल्या मात्र मिळकत करामध्ये सवलत देणाऱ्या सोसायटय़ा, गृहप्रकल्पांना नोटिसाही मिळकत कर आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे ओला कचरा जिरविण्याच्या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी करण्याचा आणि या प्रकल्पांना चालना देण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल, याबाबतची चाचपणी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार हे तंत्रज्ञान प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले असून ४५ विविध प्रकारच्या उपाययोजनांचे सादरीकरणही महापालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ अंतर्गत तरतुदीनुसार बल्क वेस्ट जनरेटर  म्हणजेच १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ा, संस्था, हॉटेल्स यांनी ओला कचरा स्वत:च्या हद्दीतच जिरविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा या सोसायटय़ा अथवा संस्थांना हे काम करण्यासाठी मार्गदर्शन तसेच आपल्या गरजेनुसार, नेमकी कशा प्रकारची यंत्रणा याची माहिती नसते. त्यामुळे या कचरा व्यवस्थापनाकडे सोसायटय़ा दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन १ किलो ते १ हजार किलोदरम्यान ओला कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायटय़ा, व्यक्ती, संस्था, कंपनीची सूची करण्याचे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाने हाती घेतले आहे.

शहराच्या विविध भागात प्रदर्शन

घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ा, संस्था, हॉटेल्स यांना कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. आदर्श प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटय़ांची यादीही संकलित करण्यात येत आहे. कोणत्या प्रकल्पांना कोणत्या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे, याची यादीही तयार करण्यात आली असून त्याचे शहराच्या विविध भागात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रक्रिया प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. त्याबाबतची सूचीही करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत त्याची कार्यवाही करण्यात येईल.

– ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा व्यवस्थापन, प्रमुख

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button