breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तापमानाची ४०.४ अंश सेल्सिअसवर उसळी

उन्हाचे चटके, उकाडय़ाचा मारा

पुणे शहर आणि परिसरातील तापमानाने पुन्हा उसळी घेत चाळिशी पार केली असून, शुक्रवारी शहरात ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान या हंगामातीलच नव्हे, तर गेल्या कित्येक वर्षांतील मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आणि उकाडय़ात आणखी वाढ झाली आहे. पुढील काही दिवस शहरातील कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्यासह शहरातील कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविली जात आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ामध्ये शहरात कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशांवर स्थिर होता. गेल्या आठवडय़ापर्यंत कमाल तापमान ३६ ते ३७ अंशांवर स्थिर राहिले होते. त्यानंतर या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच तापमानाने एकदमच उसळी घेतली. २४ मार्चला ३८ अंशांच्या आसपास असलेले कमाल तापमान दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ मार्चला चाळिशी ओलांडून थेट ४०.२ अंशांवर पोहोचले. हे तापमान गेल्या काही वर्षांतील मार्च महिन्यातील आणि हंगामातील उच्चांकी तापमान ठरले होते.

शहरातील तापमानाने चाळिशी ओलांडल्यानंतर तीन दिवस तापमान ३९.६ आणि ३९.७ अंशांच्या आसपास राहिले. त्यामुळे या काळात उन्हाच्या झळा तीव्र होत्या. तापमानात पुन्हा काहीशी वाढ होईल, असे पुणे वेधशाळेचा अंदाज होता. राज्याच्या बहुतांश भागात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळिशी पार गेला आहे. परिणामी पुण्यातही शुक्रवारी किमान तापमानाने ४०.४ अंशांपर्यंत उसळी घेत याच महिन्यात दुसऱ्यांदा उच्चांकी तापमानाची नोंद केली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ३.७ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. किमान तापमानही १८.६ अंशांवर पोहोचल्याने रात्री चांगलाच उकाडा जाणवतो आहे. दिवसभर उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण होत आहेत. शहरात आठवडाभर निरभ्र आकाश राहणार आहे. त्यामुळे शहरातील कमाल तापमानाचा पारा ३९ ते ४० अंशांच्या आसपास राहील. किमान तापमानही १८ ते १९ अंशांपर्यंत राहण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button