ऑर्थररोड कारागृहात नैसर्गिक प्रकाश व वारा नाही
लंडन – भारतीय बॅंकांना फसवून लंडन मध्ये फरारी झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात हद्दपार करावे अशी मागणी करणाऱ्या भारत सरकारच्या याचिकेवर लंडनच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. झालेल्या सुनावणीच्यावेळी आपल्याला ज्या ऑर्थररोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे तेथे नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा नसल्याची तक्रार विजय मल्ल्या याच्यावतीने करण्यात आली. त्याच्या तक्रारीनंतर कोर्टाने ऑर्थरोड कारागृहाच्या स्थितीची माहिती देणारा व्हिडीओ सादर करण्याची सूचना सरकारी वकिलांना केली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी कारागृहातील बराक क्रमांक बाराची छायाचित्रे यावेळी कोर्टात सादर केली पण केवळ त्या छायाचित्रांवर आपण विसंबून राहणार नाही असे न्यायाधिशांनी यावेळी स्पष्ट केले व कारागृहाचा दिवसाच्या वेळी घेण्यात आलेला व्हिडीओ सादर करण्याची सूचना त्यांनी केली.