एसी कोचमधील रेल्वे प्रवाशांना ब्लँकेटसाठी पैसे मोजावे लागणार
नवी दिल्ली – रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातील प्रवाशांना दिले जाणारे मोफत बेडशीट, ब्लँकेट आणि उशी आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना या वस्तु विकत घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे रेल्वेच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जादा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
रेल्वेच्या वातानुकूलित बोगीमध्ये प्रवाशांना बेडरोल मोफत देण्याची सुविधा अनेक दशकांपूर्वी रेल्वेने सुरू केली होती. त्यात एक बेडशीट, एक ब्लॅंकेट आणि एक उशी दिली जात होती. परंतु आता कोरोनाच्या संकटामुळे रेल्वेने प्रवाशांना दिली जाणारी ही सुविधा बंद केली आहे. त्यामुळे या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे साहित्य रेल्वे फलाटावर विकत घ्यावे लागणार आहे. त्यासाठी रेल्वेने फलाटांवर कियॉक्स सुरू केली आहेत. तेथे हे कीट मिळणार आहे. यात एक बेडशीट, एक मास्क आणि एक सॅनिटायझर पाऊच याची किंमत ५० रुपये आहे. तर एक बेडशीट, एक मास्क, एक सॅनिटायझर आणि एक उशी याची किंमत १०० रुपये आहे. एक बेडशीट, एक मास्क, एक ब्लँकेट, एक सॅनिटायझर, एक उशी १५० रुपयांना तर सर्व सेट २५० रुपयांना मिळणार आहे.