breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एम्पायर इस्टेट उड्डाणपूल रॅम्प कामाच्या निविदेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार ? मारुती भापकर यांची चौकशीची मागणी

  • मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले निवेदन
  • विरोधक आणि सत्ताधा-यांत एक सूर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे रॅम्पच्या १५ कोटींच्या कामाला स्थायी समितीने मान्यता दिली. सभापती, सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षाचे सदस्य यांनी संगनमत करुन महापालिका कायद्याचे उलंघन केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार होणार असून या कामाला त्वरीत स्थगिती द्यावी. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथे एम्पायर इस्टेटलगत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाला चिंचवडच्या बाजुने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या. कामासाठी १३ कोटी ९९ लाख ५७ हजार ६६८ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. निविदा सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत केवळ मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांचीच निविदा सादर झाली. त्यांनी या कामासाठी १५ कोटी ८० लाख ५५ हजार ५४६ रुपयांची निविदा सादर केली होती. त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचीही निविदा प्राप्त न झाल्यामुळे १५ मे २१ जून आणि २८ जून रोजी दिलेल्या पत्राद्वारे त्यांना हे दर कमी करण्याबाबत विचारणा करण्यात आली.

त्यानुसार त्यांनी १५ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये इतका सुधारीत दर सादर केला. महाराष्ट्र शासनाच्या सन २०१८-१९ च्या दरसुचीनुसार टेस्टींग चार्जेस, आरसीसी डिझाईन चार्जेस, सिमेंट व स्टिल फरक आणि रॉयल्टी चार्जेससह या कामाची किंमत १६ कोटी २० लाख ४७ हजार ७२२ रुपये २५ पैसे इतकी येते. यामध्ये जीएसटीचा समावेश नव्हता. मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांनी सादर केलेला दर १५ कोटी ७९ लाख ६३ हजार ३९ रुपये आहे. त्यामध्ये सुधारीत दर १५ कोटी ४८ लाख ५० हजार रुपये, अधिक १६ लाख ९१ हजार ०६७ रुपये रॉयल्टी, २ लाख ९२ हजार ५२० रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस आणि शेड्यूल बी ११ लाख २९ हजार ४५२ रुपये याचा समावेश आहे. हा दर निविदा स्विकृतयोग्य १६ कोटी २० लाख ४७ हजार ७२२ रुपये २५ पैसे या रकमेशी तुलना करता २.५२ टक्क्यांनी कमी आहे.

एम्पायर इस्टेटसमोरील उड्डाणपुलाला चिंचवडच्या बाजुने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे काम मेसर्स व्ही.एम.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडूनच करून घेण्यात येणार आहे. काल गुरूवारी (दि. १८) स्थायी समितीत सभापती, सत्ताधारी पक्षाचे सदस्य व विरोधी पक्षाचे सदस्य यांनी संगनमत करुन एकच निविदा असताना शासनाचे मार्गदर्शन व महापालिका कायद्याचे उलंघन करुन हे काम मंजूर केले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची महाआघाडीचे सरकार असताना पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचीच आघाडी आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार होणार असल्यामुळे या एम्पायर इस्टेटच्या उड्डाणपूलच्या रॅम्पच्या १५ कोटीच्या कामाला त्वरीत स्थगिती देऊन या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मारूती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button