breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘ई-बस’ची देखभाल खर्चिक

तोटय़ात चाललेल्या पीएमपीवर दरमहा नऊ लाखांचा बोजा

डिझेलसह इंधनावर होत असलेला मोठा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यातील विजेवर चालणाऱ्या (ई- बस) २५ गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या असल्या तरी पर्यावरणपूरक असलेल्या या गाडय़ा देखभाल दुरुस्तीच्या दृष्टीने काहीशा खर्चिक ठरण्याची शक्यता आहे. ताफ्यात आलेल्या २५ ई-बसच्या चार्जिगसाठी प्रतिदिन ३१ हजार २५० रुपये एवढा खर्च होणार असून महिनाभराचा हा खर्च नऊ लाखांच्या घरात जाणार आहे. पीएमपीचा दिवसेंदिवस वाढत असलेला तोटा पाहाता पीएमपीला हा खर्च परवडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पीएमपीच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या पंचवीस गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या गाडय़ांसाठी पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. एकूण २५ गाडय़ांपैकी १५ गाडय़ा पुण्यात तर उर्वरित १० गाडय़ा पिंपरी-चिंचवड शहरातील मार्गावर आहेत. या गाडय़ा संचलनात आणण्यासाठी तीन ते चार तास चार्चिग आवश्यक आहे. तीन ते चार तासांच्या चार्जिगनंतर किमान २२५ किलोमीटर अंतरापर्यंत एक गाडी धावत असून चार्जिगसाठी प्रती युनिट आठ रुपये खर्च येत आहे.

या गाडय़ा भाडेकरारावर घेण्यात आल्यामुळे करारानुसार मासिक भाडय़ापोटी पीएमपीला २.८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. हे शुल्क दर तीन वर्षांनी वाढणार आहे. या व्यतिरिक्त चार्जिगचा खर्च पीएमपी करणार आहे.  प्रत्येक बसवर दररोज किमान १,२५० रुपये म्हणजे ताफ्यातील २५ गाडय़ांसाठी प्रतिदिन ३१ हजार २५० रुपये खर्च करावा लागणार आहे.

पीएमपीच्या ताफ्यात एकूण दोन हजार गाडय़ा आहेत. त्यातील एक हजार गाडय़ा डिझेलवर चालणाऱ्या असून उर्वरित एक हजार गाडय़ा सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. पीएमपीसाठी सीएनजीवर धावणाऱ्या ४०० गाडय़ांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ११० कोटी रुपयांची रक्कम देण्याची तयारी पुणे महापालिकेने दर्शविली आहे. टाटा मोटर्सकडून ही खरेदी केली जाणार आहे. या प्रत्येक गाडीची किंमत ४४ लाख ८० हजार रुपये आहे. ई-बस आणि सीएनजीवरील गाडय़ांची तुलना करता सीएनजी बसच्या तुलनेत ई-बसच्या इंधन खर्चात केवळ १५ टक्के बचत होत आहे. त्यामुळे ई-बस खर्चिक असल्याचेही दिसून येत आहे.

पीएमपीचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून तो प्रतिदिन १४ लाखांपर्यंत पोहोचला आहे. महापालिकेच्या लेखापरीक्षणातूही ही बाब स्पष्ट झाली आहे. ई-बसमुळे इंधन खर्चात बचत होणार असल्याचा दावा असला तरी देखभाल दुरुस्तीसह चार्जिगचा खर्च पाहाता पीएमपीला हा खर्च झेपणार का, हा प्रश्न मात्र पुढे येण्याची शक्यता आहे.

५०० गाडय़ांची खरेदी

स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरणपूरक ई-बस घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याअंतर्गत पाचशे गाडय़ांची खरेदी होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० गाडय़ा तर दुसऱ्या टप्प्यात ३५० गाडय़ांची खरेदी प्रस्तावित आहे. संचालक मंडळानेही त्याला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यातील १५० गाडय़ांमध्ये १२ मीटर लांबीच्या १२५ गाडय़ा तर नऊ मीटर लांबीच्या २५ गाडय़ांचा समावेश असून यातील नऊ मीटर लांबीच्या गाडय़ा ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

दोन ठिकाणी चार्जिग सुविधा

पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवडमधील तीन मार्गावर या गाडय़ा धावत असून दोन्ही शहरांत चार्जिग स्टेशन उभारण्यात आले आहेत. पुण्यासाठी भेकराईनगर आगार येथे तर पिंपरी-चिंचवडसाठी निगडी आगारात ही सुविधा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button