breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तिकीट खिडकीवर ‘अ‍ॅव्हेंजर्स’च बाहुबली

तिकिटांसाठी प्रेक्षकांवर वाट पाहण्याची वेळ

अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स अशा व्यासपीठांवर चित्रपट आणि वेब मालिका पाहण्यासाठी आकृष्ट झालेल्या तरुणाईला अ‍ॅव्हेंजर्स – एंडगेम या चित्रपटाने पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचले आहे. चार-पाच दिवसांची प्रतीक्षा करून प्रेक्षकांना चित्रपटाची तिकिटे मिळवावी लागली. विशेष गोष्ट म्हणजे, पुण्यातील बहुतांश चित्रपटगृहांमध्ये पहिल्यांदाच पहाटेपासून चित्रपटाचे खेळ होत असून, प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे तिकीट खिडकीवर अ‍ॅव्हेंजरच बाहुबली ठरला आहे.

माव्‍‌र्हल स्टुडिओजच्या अ‍ॅव्हेंजर्स या भव्यदिव्य मालिकेतील अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा अखेरचा चित्रपट आहे. २००८ पासून सुरू झालेल्या या मालिकेतील चित्रपटांनी जगभरातील प्रेक्षकांवर अक्षरश गारूड केले आहे. त्यामुळेच अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता होती. गेल्या महिन्याभरापासून समाजमाध्यमांमध्ये या चित्रपटात सुपरहिरोंचे काय होणार, या भागात कोण कोण असणार अशी  मोठय़ा प्रमाणात चर्चा झाली. अगदी त्यावरून पैजाही लागल्या. या पूर्वी भारतात असे वातावरण केवळ दक्षिणेतील सुपरस्टार रजनिकांत किंवा बाहुबली हा चित्रपट यांच्याच वाटय़ाला आले होते.

त्यात ‘बाहुबली’ने भारतीय चित्रपटसृष्टीत कमाईचा इतिहास घडवला. मात्र, अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमने त्यावरही मात केल्याचे दिसून येत आहे.

इंग्रजीसह हिंदी, तेलुगू, तमीळमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांना जवळपास पराकाष्ठा करावी लागली. कारण देशभरात बुकिंग सुरू झाल्यानंतर दर सेकंदाला अठरा तिकिटे विकली गेली. देशभरातील काही चित्रपटगृहांमध्ये २४ तास या चित्रपटाचे खेळ होणार आहेत. चित्रपटाचा हा प्रतिसाद पुढील काही दिवस असाच टिकून राहण्याची शक्यता आहे.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाविषयी असलेल्या उत्सुकतेमुळे या आठवडय़ात एकही मराठी, हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटही प्रदर्शित झाला नाही. या भव्यदिव्य चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाची कल्पना असल्याने निर्मात्यांनी शांत राहाणे पसंत केल्याने अन्य चित्रपटांची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे.

चित्रपटाविषयी समाजमाध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे चित्रपट पाहून आलेल्यांकडून स्पॉयलर्स (कथानकातील रहस्य उघड करून टाकणे) टाकू नका अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

‘अ‍ॅव्हेंजर्स  एंडगेम’ चित्रपटाचे खेळ पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झाले. शुक्रवारी दिवसभरातील सर्व १८ खेळ हाऊसफुल्ल होते. भारतीय चित्रपटाचे अर्थकारण बाहुबली या चित्रपटाने बदलले. मात्र,  हा चित्रपट व्यवसायाच्या बाबतीत आपल्याकडच्या ‘बाहुबली’पेक्षाही मोठा ठरला आहे.

– सुगत थोरात, सिटीप्राइड

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमची तिकिटे मिळवण्यासाठी खूपच कष्ट करावे लागले. गेल्या रविवारी चित्रपटाची तिकिटे ऑनलाइन उपलब्ध झाली. मात्र, काही सेकंदातच संकेतस्थळ कोलमडले. चित्रपटगृहावर तिकिटे काढण्यासाठी रांग होती आणि एका प्रेक्षकाला जास्तीत जास्त दोनच तिकिटे दिली जात होती.

– निरंजन पेठे, पीयूष सूर्यवंशी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button