breaking-newsराष्ट्रिय

आमच्या काही नेत्यांनी कमी बोलण्याची गरज : गडकरी

आमच्या पक्षातील काही नेत्यांना कमी बोलण्याची गरज आहे असे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते बुधवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जपून बोलायला हवे, असे सांगितले.

राफेल प्रकरणावर भाजपाकडून घेण्यात आलेल्या ७० पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आमच्याजवळ भरपूर नेते आहेत आणि त्यातील काहींना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. या चित्रपटात आपल्या मुलाची सतत खायची सवय मोडण्यासाठी पालक त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबतात, असे दृश्य आहे. आमच्या पक्षातील काही नेत्यांचे असेच झाले आहे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला.

गप्प राहण्याचा आदेश हा हनुमानाची जात आणि राहुल गांधींचं गोत्र काढणाऱ्यांसाठी आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ते सर्व मस्करीत बोलल्याचं सांगत वेळ मारून नेली. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी कोणत्याही कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलत नाही. राफेलच्या प्रकरणात काँग्रेसच्या संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)च्या मागणीवरही त्यांनी भाष्य केलं. जेपीसी सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे काय, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारला आहे. काँग्रेसच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्यानं त्यांना उत्तर देणं गरजेचं नसल्याचंही मत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

लोकसभासाठी होणाऱ्या महाआघाडीवरही गडकरी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, कमजोरांचे महाआघाडी आहे, नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी सामूहिक विपक्षांचा सामना करत एकहाती सत्ता मिळवली होती. त्याप्रमाणेच मोदी पुन्हा एकदा विजयी होतील. कमजोर आणि पराभूत झालेल्या लोकांची ही आघाडी आहे. जे एकमेंकाचा सन्मान करत नाहीत.

भाजपावर सतत टीका करणाऱ्या मित्रपक्ष शिवसनेवर विचारलेल्या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, दोन्ही पक्षांमध्ये वाजपेयी असताना जसे संबंध होते तसेच आताही आहेत. ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ या म्हणीप्रमाणे शिवसेना-भाजपाचे झालं आहे. महाराष्ट्र, मराठी लोकांच्या आणि देशासाठी आमची युती लाभदायक आहे, असे गडकरी म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे असेही गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button