breaking-newsराष्ट्रिय

संतापजनक! या शाळेत जातीनुसार विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था

बिहारमधील लालगंज येथील जी ए माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था जातीनुसार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे सोपे व्हावे, यासाठी अशी आसनव्यवस्था केल्याचा दावा शाळा प्रशासनाने केला आहे. तर शाळेतील एका विद्यार्थिनीने या प्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरु झाली आहे.

वैशाली येथील लालगंजमध्ये जी ए महाविद्यालय आहे. या सरकारी शाळेत दहावी इयत्तेत शिकणाऱ्या अंजली कुमार या विद्यार्थिनीने गट शिक्षण अधिकारी अरविंद कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. ‘शाळेत विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था जातीनुसार करण्यात आली असून आमच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे’, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. शाळेत नववीत शिकणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्यानेही अंजलीच्या दावा खरा असल्याचे सांगितले. गेल्या चार वर्षांपासून शाळेत हा प्रकार सुरु असल्याचे त्या विद्यार्थ्याने सांगितले.

वैशालीतील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत एका पथकाला शाळेची पाहणी करुन येण्याचे आदेशही दिले आहेत. शाळेतील कागदपत्रांनुसार शाळेत 9 वी ते 12 वी या वर्गांमध्ये एकूण 1, 500 विद्यार्थी आहे. हजेरी पटावर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर त्याची जात लिहिण्यात आली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी हे हजेरी पटही जप्त केले आहे.

बिहारमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सरकारी योजना सुरु आहेत. यात 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी 3 हजार रुपये, नववी ते बारावीत शिकणाऱ्या मुलींच्या गणवेशासाठी एक हजार रुपये, सॅनिटरी नॅपकिनसाठी 150 रुपये आणि नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाला 1, 800 रुपयांची शिष्यवृत्ती अशा विविध योजना सुरु आहेत. 75 टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र ठरतात.

विद्यार्थ्यांमध्ये जातीवरुन भेदभाव केल्याचा आरोप शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मीना कुमारी यांनी फेटाळून लावला. ‘2014 मध्ये तत्कालीन मुख्याध्यापक फूल मोहम्मद अन्सारी यांनी हजेरी पटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करायला सुरुवात केली. यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांचा अहवाल तयार करणे सोपे जाते, असे त्यांनी सांगितले.

शाळेत सहा वर्ग असून या वर्गांमधील विद्यार्थी क्षमता 600 इतकी आहे. शाळेत हजेरीचे प्रमाण दररोज 50 ते 60 टक्के इतके आहे. त्यामुळे बऱ्याचदा वर्ग एकत्र भरवावे लागतात. यात जातीपातीचा संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. तर सरकारी योजनांसाठी विद्यार्थ्यांच्या हजेरी पटावर जातीचा उल्लेख केल्याचे प्रकार यापूर्वी ऐकलेले नाही, ही पहिलीच घटना असून हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, असे लालगंजमधील गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button