breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आदर्श विद्यार्थी आणि संस्कार देणारी शाळा महत्वाची: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अंजुमन-ए-इस्लाम लॉ कॉलेजचे नामकरण व पुस्तक प्रकाशन सोहळा

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

आजच्या युवकांना अंधारातून दिशा देण्यासाठी चांगल्या शाळेची आवश्यकता आहे. शिवाय त्या शाळेत आयुष्यभर पुरणारे योग्य संस्कार घडवून आदर्श विद्यार्थी तयार व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या विधी विद्यालयास बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव देण्याचा तसेच नीलम मुश्ताक यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाला खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री गुलाब नबी आझाद, गीतकार जावेद अख्तर, खासदार अरविंद सावंत, सुनील तटकरे, माजिद मेमन, संजय राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार कपिल पाटील, आमदार यामिनी जाधव, भाई जगताप, श्रीमती नर्गिस अंतुले, संस्थेचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी, उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, युवा शक्ती आपल्या देशाची संपत्ती व सामर्थ्य आहे. जगातली महाशक्ती होण्यासाठी ती जपायला हवी. सामर्थ्य फक्त धनसंपत्तीत नसून जनसंपत्तीत आहे. म्हणून ही पिढी योग्य संस्कारानेच पुढे जावून डॉक्टर, इंजिनिअर होऊन संस्थेचे नाव अभिमानाने मिरवितात. यासाठीच तरुण पिढीला संस्कार देणे काळाची गरज आहे. अंजुमन-ए-इस्लाम या शाळेची इमारतच चांगली नाही तर विद्यार्थीही चांगले घडविण्याचे काम करीत आहे. जी संस्था सव्वाशे वर्षे साजरी करतात, ती संस्था चांगले विद्यार्थी घडवितात.

मुंबईत राहतो तर आपल्याला एकमेकांची भाषा यायला हवी, मी मुख्यमंत्री झाल्याचा बॅरिस्टर अंतुले यांना गर्व वाटला असता. देशात हिंदू-मुस्लिम एकोपा व्हायलाच हवा. बॅरिस्टर अंतुले आणि बाळासाहेबांची खास मैत्री होती, या पुस्तकाच्या रूपाने अंतुले यांचे दिल की बात हे रूप पाहायला मिळाले. ते एक डॅशिंग मुख्यमंत्री, विद्वान माणूस होते. त्यांचे सीमा प्रश्नावरील महाजन अहवालाची चिरफाड करणारे योगदान महाराष्ट्रासाठी मोलाचे होते, असेही श्री. ठाकरे म्हणाले.

श्री. पवार म्हणाले, बॅरिस्टर अंतुले यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ते एक मजबूत, उत्तम प्रशासक, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरे आणि बॅरिस्टर अंतुले यांच्या मैत्रीला तोड नव्हती, त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नाही. राजकीय पातळीवर आणि खाजगी जीवनातही त्यांनी प्रेमभावना जपली होती, हेच त्यांच्या दररोजच्या नर्गिस यांना लिहिलेल्या पत्रातून समजते.

हे पुस्तक म्हणजे राजकारणीही प्रेम करतात, याची निशानी आहे. सध्या मोबाईल, इमेल, एसएमएसमुळे प्रेम कमी होत असून प्रेमाची दुरी वाढत असल्याची भावना गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केली.

गुलाब नबी आझाद यांनीही बॅरिस्टर अंतुले यांच्या जीवनाला उजाळा दिला.

डॉ. जहीर काझी यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली.

यावेळी अंजुमन-ए-इस्लाम लॉ कॉलेजचे बॅरिस्टर ए. आर. अंतुले कॉलेज ऑफ लॉ असे नामकरण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. तसेच स्व. ए. आर.अंतुले यांनी आपल्या पत्नी नर्गिस यांना लिहिलेली पत्रे ‘बनाम नर्गिस’ या नावाने त्यांची कन्या नीलम मुश्ताक यांनी संकलित केली आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. उपाध्यक्ष मुस्ताक अंतुले यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button