breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अमराठी भाषकांसाठी सेनेचा हिंदुत्वाचा पुरस्कार?

राममंदिराच्या उभारणीसाठी प्रसंगी पुढाकार घेण्याची घोषणा वा हिंदुत्वासाठी सत्तेत कायम असल्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून शिवसेना आगामी निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा पुरस्कार करणार हे स्पष्ट असले तरी यातून मुंबई परिसरात भाजपकडे वळलेले हिंदी किंवा गुजराथी भाषक मतदार शिवसेनेकडे पुन्हा येतील का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे, ठाकरे यांच्या एकूणच भाषणाच्या सुरावरून भाजपशी युती करणार याची खूणगाठ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधली आहे.

भाजपशी युती केल्याने शिवसेनेला मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आदी शहरांमध्ये अमराठी भाषकांची मते मिळतात. २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून युती तुटल्यापासून मुंबई महानगर परिसरातील अमराठी भाषक मतदार भाजपकडे वळले. हिंदी आणि गुजराथी भाषक मतदार भाजपकडे वळल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. १९९२-९३च्या दंगलीच्या वेळी शिवसेनाच मदतीला धावून आली होती याची आठवण उद्धव ठाकरे यांनी हिंदी आणि गुजराथी भाषकांना वारंवार करून दिली आहे. मध्यंतरी मनसेने मराठीचा मुद्दा लावून धरल्याने शिवसेनेनेही मराठीवर भर दिला. हिंदुत्वाचा मुद्दा काहीसा बोथट झाला होता. पण शिवसेनेने पुन्हा हा मुद्दा हाती घेतला आहे. राममंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणे, उद्धव ठाकरे यांची अयोध्या भेट यातून आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार शिवसेना करीत आहे.

विरोधकांची व्यूहरचना बदलणार

दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी भाजप सरकारवर यथेच्छ टीका केली तरीही त्यांच्या एकूण भाषणाचा सूर बघता शिवसेना युती करेल, असे काँग्रेस व राष्ट्रवादीचे मत आहे. युती झाल्यास राजकीय संदर्भ बदलू शकतात. त्यानुसार दोन्ही काँग्रेसला व्यूहरचना करावी लागेल.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून शिवसेना भाजपबरोबर युती करेल हे स्पष्ट होते. परंतु भाजप – शिवसेनेच्या कारभाराबद्दल सामान्य जनतेत असंतोष आहे. यामुळे युती झाली तरीही काँग्रेस आघाडीला फरक पडणार नाही. राज्यतील  मतदार काँग्रेसलाच कौल देतील.   – संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष

मेळाव्यानंतर भाजप निर्धास्त!

शिवसेनेचे दुसऱ्या फळीतील नेते शिवराळ भाषेत टीका करत भाजपचे राज्य घालवण्याच्या गर्जना करत असताना ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे दुश्मन नाहीत आणि हिंदुत्वासाठी शिवसेना भाजपसोबत आहे,’ असे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र सबुरीचा सूर लावल्याने राज्यातील भाजप नेत्यांच्या युतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना युतीत सहभागी होऊ  शकते, असे संकेतच ठाकरे यांनी मेळाव्यातून दिल्याची प्रतिक्रिया भाजपमध्ये उमटत आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे युतीतून बाहेर पडून स्वबळावर लढण्याबाबत निर्णायक घोषणा करणार काय याबाबत उत्सुकता होती. ठाकरे यांच्या भाषणाआधी खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी याच मंचावरून भाजपविरोधात  आगपाखड केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या घोषणेबाबत कमालीची उत्सुकता पसरली होती. आता युती संपली असे वातावरण या नेत्यांच्या भाषणातून तयार झाले असतानाच उद्धव ठाकरे यांनी मात्र संयत भूमिका घेत, हिंदुत्वासाठी आम्ही मोदींच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीच दिल्याने शिवसैनिकांचे सारे आडाखेच संपुष्टात आले.

युतीचा विश्वास – भंडारी

मुळात हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना व भाजपची युती झाली आहे. कोणी कितीही काहीही म्हटले तरी केंद्र व राज्यातील सत्तेत शिवसेना भागीदार आहे. युती व्हावी ही इच्छा भाजपने वेळोवेळी व्यक्त केली आहे. ठाकरे यांचे भाषण पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना युतीत राहील, असा विश्वास वाटतो, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button