breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना

पुणे | प्रतिनिधी

जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करावे. संबधित अधिकाऱ्यांनी अपघात प्रवण क्षेत्रांची पाहणी करुन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी या सुचना दिल्या.

या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. बी. बी. आहुजा, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे, तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, दरवर्षी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जातो. यावर्षी ‘रस्ता सुरक्षा महिना’ साजरा करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. हे अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग, संस्था, संघटनांनी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करावी. तसेच घेण्यात येणारे उपक्रम वर्षभर सुरु ठेवावेत, असे देशमुख यांनी सांगितले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावी. वैद्यकीय व्यावसायिकांनी या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील व्यक्तींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत, अशा सुचना दिल्या.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिंदे म्हणाले की, यांनी प्रास्ताविकातून परिवहन विभागामार्फत सन 2020 मध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. तसेच ‘ई चलन’ द्वारे करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

संजय जाधव म्हणाले, अपघात होणे व अपघातात जीव गमवावा लागणे हा त्या व्यक्तीच्या कुटुंबावर होणारा मोठा आघात असतो. अपघातात मृत्यू होणाऱ्या व्यक्‍तींमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा’ विषयक नियमांची तसेच मार्गदर्शक सूचनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहन चालवताना होणाऱ्या चुका सर्वांनी टाळायला हव्यात.

केंद्र शासनासाठी आयटीआय, चेन्नई व एनआयसी, चेन्नई यांनी विकसित केलेल्या अपघात नोंदणी व विश्लेषण प्रणाली (आयआरएडी)ची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धनंजय कुलकर्णी यांनी दिली. उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सादरीकरणातून बैठकीची रुपरेषा विषद केली. तसेच उपस्थितांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button