सोकोट्रा बेटावर अडकलेल्या 38 भारतीयांना नौदलाने वाचवले

नवी दिल्ली – येमेनला थडकलेल्या भीषण चक्रिवादळामुळे सोकोट्रा बेटावर गेल्या 10 दिवसांपासून अडकून पडलेल्या 38 भारतीयांना भारतीय नौदलाने सोडवले आहे. अदनच्या आखातातील नौदलाच्या “आयएनएस सुनैना’ या जहाजाने ऑपरेशन “निस्तर’ अंतर्गत या भारतीयांची सुटका केली असल्याचे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले. या बेटावर समुद्रकिनाऱ्याजवळ अडकून पडलेल्या या भारतीयांना आज सकाळी सोडवण्यात आले असून ते “आयएनएस सुनैना’वर सुखरुप आहेत. हे जहाज मायदेशी परत येत आहे, असेही कॅप्टन शर्मा यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन “निस्तर’ला आज सकाळी सुरूवात झाली. बेटावर अडकलेल्या 38 भारतीयांना त्वरित वैद्यकीय सुविधा, अन्न, पाणी आणि फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. फोनच्या माध्यमातून या भारतीयांच्या नातेवाईकांपर्यंत त्यांच्या सुखरूप असण्याची माहिती पोहोचवण्यात आली. “आयएनएस सुनैना’ हे जहाज गुजरातच्या पोरबंदरच्या दिशेने येत आहे.
मेकेनू चक्रीवादळ सोकोट्रा या बेटावर 24 मे रोजी थडकले होते. त्या वादळामुळे येमेन आणि शेजारच्या परिसरामध्ये मोठे नुकसान झाले होते. या वादळामुळे बंदराच्या जवळच्या बोटींमधील 3 भारतीय बुडाले होते. तर “एमएसव्ही सफिना अल खिजार’ ही 12 भारतीय खलाशी असलेली अन्य बोट बेपत्ता झाली होती, असेही प्रवक्त्यांनी सांगितले. भारतीय नौदलाला या आपत्तीबाबत समजताच “आयएनएस सुनैना’ जहाज त्या भारतीयांच्या मदतीला रवाना करण्यात आले. वादळ झालेल्या परिसरामध्ये नौदलाच्यावतीने दि. 28 आणि 29 मे रोजी हवाई पहाणी करून बेपत्ता भारतीयांचा शोधही घेतला गेला होता.