सैराटचा बॉलीवूडमध्ये ‘धडक’ एन्ट्री ; हिंदीत ट्रेलर प्रदर्शित

मुंबई – सैराट प्रदर्शित झाला आणि त्याने सर्वांना वेड लावले. आता त्याच धर्तीवर हिंदीत ‘धडक’ नावाचा चित्रपट येतोय. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या संगीतापासून ते अनेक प्रसंग सैराट सिनेमातील आहेत. सैराट सिनेमाचा ओघवता प्रवास म्हणजेच ‘धडक’ असे म्हणता येईल. चित्रपटातील संगीत असो किंवा त्यातील कोरिओग्राफी सर्व काही सैराटमधील असल्यासारखेच आहे.
या चित्रपटात परश्याची भूमिका शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर तर आर्चीची भूमिका श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर साकारणार आहे. जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट असेल. तर, ईशानने याआधी एका चित्रपटात काम केलेले आहे. तसेच, जान्हवीच्या वडिलांची भूमिका आशुतोष राणा यांनी साकारली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खैतानने केले आहे. येत्या 20 जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
सिनेमातील कथानक हे राजस्थानमधील आहे. दोन वेगळ्या वर्गातील प्रेमीयुगुलाची कथा यामध्ये मांडली आहे. ट्रेलर पाहता, अनेक गोष्टी सैराट या मूळ सिनेमाशी साम्य दाखवणाऱयाच आहेत. अजय- अतुलने सिनेमाला संगीत दिले असल्यामुळे गाण्यांमध्ये फारसा फरक नाही. सैराट सिनेमाने मराठीत पहिल्यांदाच 100 कोटींचा पल्ला गाठला होता. त्यामुळे, येत्या काळात करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मीती असलेला धडक हा सिनेमा किती कमाई करतो आणि या सिनेमात नवीन काय आहे हे पाहण्याची उत्सुकता आहे.
‘धडक’चा युट्यवर पाहा ट्रेलर ….
https://www.youtube.com/watch?time_continue=6&v=TIE92mUvSsw