सीबीएसई दहावीत पिंपरी-चिंचवडमधील शाळांची बाजी

पिंपरी – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. त्याचबरोबर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे.
सीबीएसईच्या दहावी परीक्षेसाठी यंदा देशभरातून १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पुण्यातील सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनीही यामध्ये चांगले यश मिळविले आहे. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा दहावीचा निकाल १०० % लागला आहे. परीक्षेला एकूण ८० मुले परीक्षेला बसली होती. ४१ मुलांना ९०% पेक्षा जास्त तर ७३ मुलांना ८०% पेक्षा जास्त गुण मिळाले. अखिल अत्रे ९८.४% टक्के मिळवून प्रशालेत पहिला आला. मृण्मयी करवंदे ९७.२ टक्के, गार्गी म्हसकर ९७.२ टक्के, ऋचा डिके ९६.८ टक्के, गायत्री साने ९६.८ टक्के गुण मिळवले आहेत. महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा २० मुली आणि १९ मुले असे एकूण ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ती सर्व उत्तीर्ण झाली. साक्षी कमलापुरे हिने ८५.४ टक्के तर ओंकार गोरवडे ८३. ८ तसेच शुभम शिंदे याने ८३. ८ टक्के गुण प्राप्त केले आहे.