सावधान…! तुमच्या सोशल मीडियावर आता सरकारचा डोळा

नवी दिल्ली : फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडियावर जर तुम्ही असाल, तर सावध राहा. केंद्रातील मोदी सरकार यापुढे सर्व सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने एका खासगी कंपनीला कंत्राट देऊ न असे सॉफ्टवेअर तयार केले आहे की, ज्याद्वारे तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल.
यूट्यूबवर तुम्ही काय पाहत आहात, व्हॉट्अॅपवर तुम्हाला काय संदेश वा छायाचित्रे, व्हिडीओज येत आहेत वा तुम्ही पाठवत आहात, फेसबुकवर तुम्ही काय पोस्ट केली आहे, तुमच्या ईमेलद्वारे तुम्ही कोणाला व काय मेल केला आहे, त्यात काय लिहिले आहे, ही सर्व माहिती या सॉफ्टवेअरमुळे केंद्र सरकारला कळेल.
काँग्रेस न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
काँग्रेसने या विरोधात मैदानात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत आयुष्यावर हल्ला आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप होऊ नये, यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते व प्रख्यात कायदेतज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.