काश्मीरमध्ये महिलेवर दहशतवाद्यांचा गोळीबार, २ वर्षांपूर्वी पतीचीही झाली होती हत्या
जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे एका महिलेवर गोळीबार करुन तिची हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. नगीनाजान असे या महिलेचे नाव असून दोन वर्षांपूर्वी नगीना यांचे पती मोहम्मद युसूफ लोन याची देखील दहशतवाद्यांनी अशाच पद्धतीने हत्या केली होती.
बुधवारी सकाळी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा येथील गावात राहणाऱ्या नगीनाजान यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात नगीनाजान यांच्यासोबतच तरुणही जखमी झाला. नगीनाजान आणि त्या तरुणाला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. नगीनाजान या गोळीबारात गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबतच्या तरुणावर उपचार सुरू आहेत. जलालुद्दीन असे या जखमी तरुणाचे नाव आहे.
नगीनाजान यांचे पती मोहम्मज युसूफ लोन याची देखील दोन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. मोहम्मद युसूफ हे दहशतवादी आणि जम्मू- काश्मीर पोलीस या दोघांसाठी खबरी म्हणून काम करत होता, असा संशय दहशतवाद्यांना होता. या संशयातून त्यांनी मोहम्मद युसूफ याची हत्या केली होती.