संभाजी भिडेंविरोधात नाशिक महापालिकेची न्यायालयात तक्रार

नाशिक : ‘आपल्या शेतातील आंबे खाणाऱ्या १५० जणांना मुले झाली, ज्यांना मुलगा हवा, त्यांना मुलगाच होईल’ असे विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याचा भंग केल्याप्रकरणी नाशिक महापालिकेने येथील न्यायालयात तक्रार दाखल केली. वादग्रस्त विधानांबाबत जिल्हास्तरीय ‘पीसीपीएनडीटी’ सल्लागार समितीने प्राथमिक चौकशीत भिडे यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यांच्या विरोधात न्यायालयात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्याच्या समितीने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने ही कार्यवाही केली.
नाशिक येथे १० जून रोजी भिडे यांची सभा झाली होती. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. या संदर्भात नगरच्या ‘पीसीपीएनडीटी’ सल्लागार समितीचे सदस्य गणेश बोऱ्हाडे यांनी राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे तक्रार केली. भिडे यांची विधाने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग करणारी असल्याचे लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने भिडेंना नोटीस बजावली होती, परंतु ती परत आली. कायद्याच्या २२ कलमांन्वये गर्भलिंग निदानाबाबत जाहिरात करता येत नाही, अंदाज व्यक्त करता येत नाही तसेच कोणताही दावा करता येत नाही. हे कलम शिक्षेस पात्र असून भिडेंनी त्याचे उल्लंघन केले असल्यावर समितीचे एकमत झाले.