लहान मुलांसाठी धम्माल मेजवानी…

बालपण म्हणजे खुशाल बागडण्याची, धम्माल मस्ती करण्याची पर्वणीच असते. त्यात उन्हाळ्याच्या सुट्टया म्हटलं की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळे दिग्दर्शक विजू माने यांची “मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी आहे.
“मंकी बात’ ही कथा आहे कोल्हापूर मध्ये राहणाऱ्या वायू (वेदांत आपटे) या 11 12 वर्षाच्या मुलाची. त्याच्या वडिलांना श्रीकांत देशमुख (पुष्कर श्रोत्री) अचानक मुंबईत नोकरी मिळते आणि तो आई (भार्गवी चिरमुले) आणि वडिलांसोबत मुंबईत राहायला येतो. पण मुंबईत आल्यानंतर त्याच्या सोसायटीतील, शाळेतील मुले त्याच्याशी काहीसे फटकून वागत असतात. तो गावाकडचा असल्याने त्याला घाटी म्हणून सतत चिडवत असतात. या सगळ्यामुळे तो खूप दुःखी होतो. वायूचे त्याच्या वडिलांसोबतचे नाते हे मैत्रीसारखे आहे, पण मुंबईत आल्यावर वडिलांना देखील कामाच्या व्यापात त्याला वेळ देता येत नाही.
तसेच छोट्या छोट्या कारणावरून देखील त्याचे वडील त्याला ओरडत असतात.त्यामुळे आपण काहीही चुकीचे करत नसताना वडील आपल्याला ओरडतात. त्याच्यापेक्षा आपण खरंच वाईट वागूया असे तो ठरवतो.आपल्या मस्तीला कंटाळून वडील आपल्याला कोल्हापूरला पाठवतील आणि तिथे आपण आपल्या जुन्या मित्रांसोबत आनंदाने राहू असे वायूला वाटते. त्यामुळे तो खूप जास्त मस्ती करायला लागतो. पण आपल्या मस्तीमुळे दुसऱ्याला त्रास होतोय याची त्याला कल्पनाच येत नाही, दरम्यान तो चुकीचे वागत असल्याची जाणीव एक व्यक्ती (अवधूत गुप्ते) त्याला सातत्याने करून देतो. पण त्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. त्यामुळे ती व्यक्ती वायुला शिक्षा देते ती शिक्षा नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी “मंकी बात’ चित्रपटगृहात जाउन बघायला हवा.
दिग्दर्शक विजू माने यांनी यापूर्वी वैविध्यपूर्ण सिनेमे दिले आहेत. त्यांचा नुकताच येउन गेलेला “शिकारी’ बोल्डनेस मुळे चर्चिला गेला, आता त्यांनी खास लहान मुलांसाठी “मंकी बात’ हा चित्रपट आणला आहे. च चित्रपटाची कथा विजू माने आणि महेंद्र कदम यांची आहे, लहान मुलांना काय बघायला आवडेल याचा पुरेपूर विचार करून मांडणी करण्यात आली आहे. संदीप खरे यांची गीते आणि संवाद चांगले आहेत. मध्यंतरापर्यंत कथेचा स्पीड उत्तम आहे, त्यानंतर वेग काहीसा कमी झाला आहे. शेवट करतान थोडी घाई झाल्याचेही वाटते.
कलाकारांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर वेदांत आपटे या बाल कलाकाराने वायूची भूमिका साकारताना धम्माल मजा केली आहे, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले यांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. अवधूत गुप्तेची नवी इनिंग त्याच्या चाहत्यानाना आवडेल अशीच आहे, इतर कलाकारांची कामे चांगली झाली आहेत.
“हाहाकार…’ आणि “श्या… कुठे उएऊन पडलो यार’ ही गाणी मस्त झाली आहेत, संदीप खरेची गित्ते डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली आहेत तर शुभंकर कुलकर्णी याने गायली आहेत. परिणीता ,रबने बना दि जोडी ,लगे रहो मुन्ना भाई , इंग्लिश विन्ग्लीश ,शामिताभ अशा अनेक हिंदी चित्रपटांचे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या बालचित्रपटासाठी विशेष माकड तयार केले आहे, ते धम्माल मज्जा आणते.
एकंदरीत “मंकी बात’ बद्दल सांगायचे तर उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीच्या मनोरंजासाठी आलेले हे माकडा फुल्ल टू धम्माल आणते, हा चित्रपट लहान मुलांसाठी धम्माल मेजवानी आहे.
चित्रपट मंकी बात
निर्मिती निष्ठा प्रॉडक्शन,
प्रस्तुती – प्रो ऍक्टिव्ह
दिग्दर्शक विजू माने
संगीत डॉ. सलील कुलकर्णी
कलाकार – वेदांत आपटे, पुष्कर श्रोत्री, भार्ग वी चिरमुले,अवधूत गुप्ते, नितीन बोर्डे,
मंगेश देसाई, नयन जाधव, विजय कदम, राधा सागर, समीर खांडेकर
रेटिंग 3.5