breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

मेट्रो सुरू झाल्यास सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल

शशिकांत लिमये यांचे मत; रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने ‘मेट्रो संवाद’ 
पिंपरी – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात पुणे मेट्रोच्या फेज 1 चे काम वेगात सुरू आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या विविध पर्यायांना समाविष्ट करत मेट्रोची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे ही पुणे मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या दोन्ही शहरांमधील सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार आहे, असे मत पुणे मेट्रोचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुणे मेट्रोविषयी अधिक जाणून घेता यावे. तसेच मेट्रोबाबत असलेल्या विविध प्रश्नांची उकल होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे ‘मेट्रो संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, प्रथम महिला मुग्धा कुलकर्णी, सचिव प्रवीण घाणेगावकर, माजी अध्यक्ष हिरा पंजाबी, अनिल कुलकर्णी, अरविंद खांडकर, ईश्वर ठाकूर, राणू सिंघानिया, शुभांगी कोठारी, रो. नरेंद्र मेहेर, सुभाष जयसिंघानी, मेट्रो कमिटी सदस्य रमेश राव, मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बि-हाडे आदी उपस्थित होते.
शशिकांत लिमये म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक सध्या खाजगी वाहतूक सेवेला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. वर्तमान स्थितीत केवळ 15 टक्के नागरिक सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करीत आहेत. हा वापर मेट्रोमुळे 80 टक्क्यांवर जाईल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर केल्यास नागरिकांना वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येईल. वाहनांची गर्दी कमी झाल्यास पर्यावरणीय समस्या कमी होतील.
ठराविक अंतरावर मेट्रो स्टेशन असल्याने नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. मेट्रो मार्गाव्यतिरिक्त भागात फिरण्यासाठी मेट्रोच्या वतीने शेअर सायकल, ई-रिक्षा, बस यांसारखे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मेट्रो स्थानकांवर 65 टक्के इंधनाची गरज सौरऊर्जेतून पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पर्यावरणपूरक बनणार आहे.
मेट्रोची स्थानके, प्रत्येक स्थानकाची संकल्पना, मेट्रो मार्गावरील समस्यांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी तत्पर असलेली जलद प्रतिसाद यंत्रणा, जमिनीचे हस्तांतरण, खर्च यांसारख्या विविध विषयांबाबत रमेश राव यांनी माहिती दिली. जगमोहन सिंग यांनी प्रास्ताविक केले. माजी अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button