मावळातील महायुतीचा उमेदवार निष्क्रीय – हर्षवर्धन पाटील

- पुरस्कार कसा मिळतो, हे सगळ्यांना माहितेय
- आता हवा बदललीय, परिवर्तन होणारच
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभेसाठी महायुतीने निष्क्रीय उमेदवार दिलाय, पाच वर्षात खासदारांनी काहीच कामे केली नाहीत. केवळ स्वताःचा स्वार्थ साधला आहे. सलग पाच वर्षे पुरस्कार मिळतोय म्हणून त्यांना निवडून दिलं पाहिजे असं काहीच नाही. संसदेत सुशिक्षित उमेदवार द्यायला हवा, त्यांना इंग्रजी-हिंदी या भाषेची जाण हवीय, त्यामुळे मावळचा विकास साधण्यासाठी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवारांना विजयी करा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पिंपळे निलख येथील काॅंग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार पार्थ पवार, आमदार विश्वजीत कदम, आमदार दिलीप सोपल, विजय अंभोरे, अमिर शेख,नदिम मुजावर, पृथ्वीराज साठे, धनश्याम शेलार, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, देशात-राज्यात आता हवा बदलली आहे. गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेनेने दिलेले एकही आश्वासन पुर्ण केले नाही. पिंपरी-चिंचवडचे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविला नाही. शहराला चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन देवूनही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एच.ए कंपनीच्या कामगारांना पगार होत नाही, त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आलीय, शहरातील संरक्षण हद्दीचे रस्त्याचा प्रश्न खासदारांना सोडविता आलेला नाही. केवळ आरोप करायचे, आश्वासने देवून घोषणा केल्या. परंतू स्वार्थ साधाण्यापलिकडे काहीच केलेले नाही. त्यामुळे पुढे राज्यात आघाडीचे सरकार आल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेची चाैकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पार्थ पवार म्हणाले की, भाजप-शिवसेनेने मागील पाच वर्षात दिलेली आश्वासने पुर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लोकसभेच्या पहिल्या, दुस-या आणि तिस-या टप्प्यातील सर्व्हेवरुन आघाडीला किमान 35 जागा मिळणार असून मुख्यमंत्री, पंतप्रधानाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. तरीही गाफील राहू नका, घर टू घर प्रचार करा, सर्वांनी मतभेद विसरुन काम करा, देशात-राज्यात परिवर्तन घडवायचे आहे. भाजप सरकार इतिहास बदलायला निघाले आहेत. या सरकारने विकास कामे केली असती तर पुलवामा हल्ल्यातील जवानावर मते मागण्याची वेळ आली नसती. या सरकारने सरदार वल्लभभाईचा पुतळा उभारला पण छत्रपती शिवाजी महाराजाचे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारलं नाही. तसेच मावळात आपणच गुलाल उधाळणार आहोत, असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार दिलीप सोपल, आमदार विश्वजीत कदम, सचिन साठे आदींनी मनोगते व्यक्त केली.