breaking-newsपुणेमहाराष्ट्र

नव्या इमारतीच्या “स्ट्रक्‍चरल ऑडिट’चीही घाईच

  • पालिकेला फक्‍त सात दिवसांत हवे “ऑडिट’ : सीओईपीलाही पत्र

पुणे – महापालिकेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या घाईमुळे घाई गडबडीने काम उरकणाऱ्या पालिका प्रशासन आणि भाजपलाही इमारतीच्या “स्ट्रक्‍चरल ऑडिट’चीही घाई झाल्याचे दिसत आहे. नवीन विस्तारीत इमारतीचे “कॉम्प्रेहेन्सिव स्ट्रक्‍चरल ऑडिट’ सात दिवसांत करून द्यावे, असे पत्र प्रशासनाने गुरुवारी तातडीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीआईपी)ला दिले आहे. त्यामुळे सात दिवसांत हे “ऑडिट’ योग्य पद्धतीने होणार की संबधिताना “क्‍लीन चीट’ देण्यासाठी ही गडबड केली जात आहे? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

महापालिकेने सीओईपीला पाठविलेल्या पत्रात, “उद्‌घाटनाच्या दिवशी इमारतीमध्ये एक नव्हे, तर दोन ठिकाणी पाणीगळती झाली’ असे नमूद केल्याने आता दुसरी गळती नेमकी कोठे झाली? याबाबत प्रश्‍न आहे. महापालिकेने तब्बल 49 कोटी रुपये खर्चून नवीन विस्तारीत इमारत बांधली. तिचे लोकार्पण सुरू असताना इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी गळाले. तर बुधवारी सायंकाळी इमारतीच्या गॅलरीचे काम सुरू असतानाच, स्लॅबचा तुकडा पडून एक महिलाही जखमी झाली आहे. त्यामुळे या इमारतीच्या कामाचा दर्जा आणि उद्‌घाटनासाठी काम पूर्ण केल्याचे समोर आले आहे. त्याचे पडसाद गुरूवारी झालेल्या मुख्यसभेत उमटले. याप्रकरणी आंदोलन सुरू असतानाच, प्रशासनाने इमारतीच्या ऑडिटचे पत्र सीओईपीला हातोहात पाठविले. त्यात “या इमारतीची गळती झाल्याने सात दिवसांत ऑडिट करून द्यावे. त्यासाठी आवश्‍यक माहिती, नकाशे तत्काळ उपलब्ध करून दिले जातील,’ असे नमूद करण्यात आले आहे.

एक नव्हे, दोन ठिकाणी गळती
उद्‌घाटनाच्या दिवशी या इमारतीमध्ये सभागृहाच्या पूर्वेला एका ठिकाणी गळती झाल्याचे समोर आले. मात्र, महापालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रानुसार, प्रत्यक्षात दोन ठिकाणी गळती झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दुसरी गळती कोठे झाली आणि त्यामुळे काही नुकसान झाले का? हा प्रश्‍न उपस्थित होत आहेत. तसेच पालिकेला सात दिवसांच्या आत ऑडिट रिपोर्ट हवा असल्याने या कामाच्या तपासणीसाठी घाई केली जाणार नाही ना? असाही प्रश्‍न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button