मध्यप्रदेशातील सर्व जागा समाजवादी पक्ष लढणार

लखनौ – समाजवादी पक्षाने मध्यप्रदेशातील सर्व 230 मतदार संघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या तयारीसाठी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे 18 मे पासून तीन दिवसांच्या मध्यप्रदेश दौऱ्यावर होते. मध्यप्रदेशातही सायकल जोरात चालेल असे त्यांनी म्हटले आहे.
सायकल हे समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यात अखिलेश यांनी राज्यात विस्तृत प्रवास करून विविध ठिकाणी पक्षाच्या स्थितीचा अंदाज घेतला आणि तेथील मतदारांशी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. भाजपच्या पंधरा वर्षांच्या भोंगळ कारभारमुळे राज्याची रया गेली असून अडचणीत आलेल्या जनतेच्या मदतीला आम्ही धाऊन येऊ आणि त्यांना मदतीचा हात देऊ असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या समाजविघातक राजकारणामुळे सामान्य जनेतेचे मोठे नुकसान होत असून केवळ विकासाचीच कास धरली तरच लोकांना जीवन सुसह्य होऊ शकते असे ते म्हणाले. समाजवादी पक्षाच्या सरकारने उत्तरप्रदेशात विकासाचे मोठे काम केले आहे तसे काम या राज्यात होण्याची गरज आहे असे सांगताना त्यांनी उत्तरप्रदेशात झालेला आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वे, मेट्रो, समाजवादी पेन्शन स्कीम इत्यादी कामांचे दाखले दिले.