बिहारमध्ये 400 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यावर धुडगूस, अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील नाराजीचा उद्रेक झाल्याने बिहारमध्ये जवळपास 400 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला. यामध्ये महिलांची संख्या जास्त होती. सह-कर्मचारी सविता पाठकचा मृत्यू झाल्याने हे सर्वजण नाराज होते. पोलीस लाइनच्या बाहेर कित्येक तास हा राडा सुरु होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सविताला डेंग्यू झाला असतानाही वरिष्ठांनी तिला सुट्टी देण्यास नकार दिला. संतापलेल्या प्रशिक्षणार्थींनी डीएसपी मोहम्मद मसहलुद्दीन यांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर घटनास्थळी दाखल झालेले ग्रामीण एसपी, शहर एसपी तसंच डीसीपींशी वाद घालत त्यांच्याशीही गैरवर्तवणूक केली.
बुद्धा कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोदीपूर येथे झालेल्या हिंसाचारात डीएसपी दर्जाचे अनेक अधिकारी जखमी झाले. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, एसएसपी मनु महाराज यांनीदेखील जवळपास 40 मिनिटं घटनास्थळाला भेट देणं टाळलं.
प्रशिक्षणार्थींचा आरोप आहे की, सविता तीन दिवसांपासून तापाने फणफणत असतानाही डीएसपींनी तिला सुट्टी देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर या परिस्थितीत तिला कारगील चौकावर वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सविताला बुधवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डीजीपी के एस त्रिवेदी यांना पुढील तीन दिवसांत घटनेचा अहवाल सादर कऱण्याचा आदेश दिला आहे.
डीजीपी के एस त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, अद्याप सर्वांना प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. अशाप्रकारे बेशिस्त आणि हिंसक आंदोलन करण्यासाठी त्यांना कदाचित कोणीतरी भडकवलं असावं. त्रिवेदी यांनी डीआयजी राजेश कुमार यांनी हिंसाचाराची चौकशी करण्यास सांगितलं आहे.
हिंसाचार सुरु होताच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार करत प्रशिक्षणार्थींना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस वाहनांची तोडफोड करत होते. त्यांनी काही कार्यालयांचीही तोडफोड केली. कॉम्प्लेक्सच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी काही दुकानांमध्येही तोडफोड कऱण्यास सुरुवात केली.
जवळच असणाऱ्या एका मंदिरातील सीसीटीव्हीची तोडफोड करत त्याची हार्ड ड्राइव्ह घेऊन जाण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरु होता. पण स्थानिकांनी त्यांच्यावर विटा आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. यानंतर प्रशिक्षणार्थींनी देखील दगडफेक केली. यामध्ये एकूण 10 जण जखमी झाले आहेत.