Mahaenews

बालकलाकार लावणार ‘गाढवाचं लग्न’

Share On

जुन्या काळात गाजलेली अनेक नाटकं पुन्हा रंगभूमीवर येत आहेत. ‘गाढवाचं लग्न’ हे गाजलेलं वगनाट्य रंगभूमीवर येत असून, ते सादर करणार आहेत बालकलाकार.

प्रथमेश राणे, आरएडीएव्ही कॉलेज

पु. ल. देशपांडे यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक काही दिवसांपूर्वी बालकलाकारांनी रंगभूमीवर सादर केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य बालनाट्य म्हणून रंगभूमीवर येत असून, काही बालकलाकार ते सादर करणार आहेत. मुलांनाही ही गोष्ट कळावी यासाठी त्यात काही बदल करण्यात आले आहेत. येत्या ६ मे रोजी यशवंत नाट्यमंदिरात त्याचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.

जुन्या काळातली नाटकं रंगभूमीवर मोठ्या संख्येनं येत असतात. पण, एखादं नाटक बालनाट्य म्हणून रंगभूमीवर येणं हे क्वचितच दिसतं. ‘व्यक्ती आणि वल्ली’नंतर रंगभूमीवर येऊ घातलेल्या ‘गाढवाचं लग्न’मुळे हा योग पुन्हा एकदा जुळून येणार आहे. प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, नंतर मोहन जोशी, सविता मालपेकर यांच्या अफलातून अदाकारीनं हे नाटक गाजलं आहे. छोट्यांनाही ‘गाढवाच्या लग्ना’ची गोष्ट कळावी म्हणून ही कलाकृती पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. सतरा बालकलाकार अन् ‘चला हवा येऊ द्या’फेम अंकुर वाढवे हे नाटक सादर करणार असून, तेजस बाविस्कर या बालनाट्याचं दिग्दर्शन करताहेत. गीताची धुरा सुरेश लाड – कृष्णा पाटील तर अमित इंदुलकर नेपथ्य व सौरव शेठ प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळणार आहेत. गोट्या सावंत व श्रृती कदम नाटकाचे सुत्रधार आहेत.

या नाटकासाठी मुंबईतल्या कुठल्याही एका शाळेतून बालकलाकार न निवडता विविध भागांमधल्या शाळांतल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आलंय. मागील शैक्षणिक वर्षात या सतरा जणांची निवड झाली असून, काही दिवस त्यांच्या जोरदार तालीम सुरू आहेत. ‘फक्त गॅजेट्स अन् व्हिडीओगेम्समध्ये रमणारी मुलं आवडीनं रंगभूमीवर रमत आहेत हे बालनाट्य रंगभूमीसाठी फार आश्वासक चित्र आहे’ असं निर्माते अशोक शिगवण यांनी यावेळी सांगितलं. या बालनाट्याचे प्रयोग महाराष्ट्रभर सातत्यानं प्रयोग केले जाणार आहेत.

बालनाट्य रंगभूमीचं चित्र उदासीन आहे असं नेहमीच म्हटलं जातं. परंतु त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. खरं तर असा एखादा नियमच करावा की, किमान एका बालनाट्याची निर्मिती केल्याशिवाय इतर नाटकांना परवानगी मिळणार नाही. जेणेकरून बालनाट्यांची संख्या आपोआप वाढायला लागेल आणि व्यावसायिक स्पर्धेपोटी दर्जेदार बालनाट्यं रंगभूमीवर येऊ लागतील.

– अशोक दगडू शिगवण, निर्माते

Exit mobile version