पीएमपीएमएलच्या निगडी डेपोला टाळे, कर्मचाऱ्यांची बदली स्वारगेटला
पिंपरी: पीएमपीएमएलच्या निगडी येथील कार्यशाळेला गुरुवारपासून (20 एप्रिल) टाळे ठोकण्यात आले. तेथील 70 कर्मचाऱ्यांची बदली स्वारगेट येथील मध्यवर्ती कार्यशाळेत करण्यात आली आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी पीएमपीएमएल ही एकच कंपनी असताना गाड्यांच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी निगडी आणि स्वारगेट या दोन ठिकाणी मध्यवर्ती कार्यशाळा उभारण्यात आल्या होत्या. परंतु निगडीतील कार्यशाळेत पूर्ण क्षमतेने कामकाज होत नसल्याचा ठपका ठेवून ती बंद करण्यात आली. त्याबाबतचे आदेश मुंढे यांनी बुधवारी दिल्यानंतर आजपासून त्याची अंमलबजावणीही प्रशासनाने सुरू केली.
या कार्यशाळेत पिंपरी, भोसरी आणि निगडी डेपोच्या गाड्यांची दुरूस्ती केली जात होती. येथील कार्यशाळेत फक्त इंजिन दुरूस्तीचे काम होत असल्याने गाडयांच्या इतर दुरूस्तीसाठी या गाडया स्वारगेट कार्यशाळेत पाठवाव्या लागत होत्या. या कार्यशाळेतील 70 कर्मचारी गाडयांचे पासिंग करण्याचे तर काही कर्मचारी दुरूस्तीचे काम करत होते. या सर्व कर्मचा-यांना आता स्वारगेट येथील कार्यशाळेत पाठविण्यात आले आहे. तसेच बसच्या आरटीओ पासिंगचे काम आता डेपोनिहाय वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे पासिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची डेपोमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे स्वारगेट डेपोमध्ये आता निगडीच्या कर्मचाऱ्यांसह एकूण 270 कर्मचारी एकाच ठिकाणी गाडयांच्या देखभाल दुरुस्तीसाठी उपलब्ध होणार आहेत.