पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर कार्यालय रिकामे करण्याचा आदेश

- प्रशासनाच्या गतिमान कारभारामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप
मुंबई – पारदर्शक आणि गतिमान कारभाराचा टेंभा मिरविणाऱ्या फडणवीस सरकारच्या प्रशासनाचा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर लगेचच दुपारी त्यांचे मंत्रालयातील कार्यालय त्वरीत रिकामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने दिले. प्रशासनाच्या गतिमान कारभारामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.
कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे काल गुरूवारी पहाटे 4.35 वाजता झाले. फुंडकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री होते. सोमय्या येथील रुग्णालयात त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी नेण्याची तयारी होती. इतक्यात दुपारच्या सुमारास सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने फुंडकर यांच्या कार्यालयात फोन करून मंत्री महोदयाचे निधन झाले असून त्यांचे कार्यालय रिक्त करून व बंद करून त्याचा ताबा सामान्य प्रशासन विभागाकडे सुपुर्द करण्याचे आदेश दिला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
प्रशासनाकडून आलेल्या आदेशाची माहिती मिळताच फुंडकर यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सामान्य प्रशासनातील त्या संबंधित अधिकाऱ्याला फोन करून कार्यालय तर रिकामे करून देवू. मात्र फुंडकर यांच्या पार्थिवाला अग्नी तरी मिळू द्या, असे सांगत परिस्थितीचे भान आणून दिले. याबाबत फुंडकर यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागातून आलेल्या “गतिमान’ आदेशाला दुजोरा दिला.
भाजप कार्यालयात पार्थिव ठेवले नाही
पांडुरंग फुंडकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. तसेच पक्षाचे ते एकेकाळी प्रदेशाध्यक्षही होते. फुंडकर यांनी आपल्या उमेदीच्या काळात पक्षाची अनेक धुरा आपल्या खांद्यावर घेत पक्षसंघटन वाढीस नेण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. असे असताना मुंबईतील कार्यकर्त्यांना त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईतील प्रदेश कार्यालयात ठेवले नसल्याची बाब समोर आली आहे. गुरुवारी फुंडकर यांचे निधन झाले असतानाच त्याच दिवशी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाचा उमेदवार विजयी झाला. या विजयाच्या उन्मादानेच पक्षाचे नेते त्यांचे पार्थिव प्रदेश कार्यालयात आणण्यास विसरल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांमधूनच संताप व्यक्त केला जात आहे.