नवाज शरीफ यांची एनएबी प्रमुखांना 1 अब्ज डॉलर्सची नोटीस

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एनएबी (नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्यूरो) प्रमुख न्यायमूर्ती (निवृत्त) जावेद इक्बाल यांना 1 अब्ज डॉलर्सची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवाज शरीफ कुटुंबीयांनी भारतात 4.9 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाल्याची माहिती एनएबीने प्रसिद्ध केली होती, त्या संबंधात नवाज शरीफ यांनी आपले वकील डोगर यांच्या मार्फत ही नोटीस पाठवली आहे.
नवाज शरीफ यांच्याबद्दल चुकीची माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल जावेद इक्बाल यांने चौदा दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी आणि 1 अब्ज डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नवाज शरीफ यांच्या वकिलांनी केली आहे. असे न केल्यास जावेद इक्बाल यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जावेद इक्बाल यांनी आपला माफीनामा सर्व इंग्रजी आणि उर्दू वृत्तपत्रांत प्रसिद्ध करावा असे 17 मे रोजी जारी केलेल्या नोटीशीत सांगण्यात आले आहे.
जागतिक बॅंकेच्या एक अहवालानुसार एनएबीने नवाज शरीफ यांनी भारतात 4.9 अब्ज डॉलर्स पाठवल्याचे म्हटले होते, परंतु जागतिक बॅंकेने त्यावर त्वरित प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले होते. की अहवालात पैसा गुंतवण्याचा उल्लेख नाही, आणि कोणाचे नावही घेण्यात आलेले नाही.
सदर अहवालात काही तथ्य नसल्याचे स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानने म्हटले होते.