नक्षल्यांचा राजीव गांधींप्रमाणे मोदींना संपवण्याचा कट, पुरावे हाती : मुख्यमंत्री

मुंबई : ”अर्बन नक्षल फ्रंटवर झालेल्या छापेमारीत अनके पुरावे सापडले आहेत. यामध्ये इंटर्नल कम्युनिकेशन प्राप्त झालंय, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींप्रमाणे एलिमिनेट केलं पाहिजे, अशी सूचना आपल्या केडरला एक फ्रंटल नेता देतोय,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
”छापेमारीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत, ज्या कोर्टात सादर केल्या जात आहेत. सध्या पोलिसांना चौकशी करु दिली पाहिजे, त्यानंतर अधिक बोलणं योग्य राहील. यावर केंद्र आणि राज्यातील यंत्रणा नक्कीच क्रॅक डाऊन करतील,” असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नक्षली कारवायानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकीचं निनावी पत्र आलं आहे. हे पत्र आपण पोलिसांना दिलं असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आम्ही ‘मार्क्स’च्या विचारांनी प्रेरित लोक आहोत. आमच्यातील काही जणांना ठार करुन तुम्ही आमचा विचार संपवू शकणार नाही. गडचिरोलीत जे काही घडले त्याचा हिशेब नक्कीच होईल, अशा आशयाची भाषा त्या पत्रांमध्ये वापरण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ही पत्रे नेमकी कुठून आली याचा कसून तपास गृह विभागाकडून सध्या केला जात आहे.
कोरेगाव-भीमातील घटनेप्रकरणी नक्षलसमर्थक चौघांना बुधवारी अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया वाढण्याची शक्यता लक्षात घेऊनही सतर्कता बाळगली जात आहे.