breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दोन दशकांची वाटचाल अन्‌ राष्ट्रवादी…

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष 20वा वर्धापन दिन रविवारी (दि. 10) साजरा करीत आहे. भाजप सरकार विरोधात पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता यानिमित्ताने केली जाणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी यथोचित शक्‍तीप्रदर्शनाचा याद्वारे प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीच्या दोन दशकांच्या वाटचालीची पिंपरी-चिंचवड कामगार नगरी साक्षीदार राहिली आहे. कामगार नगरीच्या विकासात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोलाचा वाटा मानला जातो; मात्र सत्तेचा उन्माद करणाऱ्यांकडे राष्ट्रवादीच्या धुरीणांनी दुर्लक्ष केले. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला, यातून योग्य तो धडा घेऊन राष्ट्रवादीने पुढील वाटचाल करण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांसह पिंपरी-चिंचवडकरांमधून व्यक्‍त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका स्थापनेनंतर सुरुवातीला कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. महाराष्ट्राचे दिवंगत शालेय शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांचा त्यावेळी महापालिकेवर एकहाती अंमल होता. शहरातील सध्या कार्यरत असलेले अनेक मातब्बर नेते हे मोरे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असत. मात्र मोरे यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड शहराचा आणि महापालिकेचा कारभार कॉंग्रेसपासनू फरकत घेतलेल्या व 19 र्व्शांपूर्वी जन्माला आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कारभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या हाती घेतला. त्यानंतर मोरे यांचे सर्व समर्थक वेगवेगळ्या पक्षात विखुरले गेले. त्यातील निम्म्याहून अधिक कार्यकर्ते हे नंतर पवार यांच्या कट्टर समर्थकांमध्ये गणले जाऊ लागले.

तब्बल पंधरा वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता शहरात होती. या काळात राष्ट्रवादीने शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, उद्याने ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची देण; परंतु शहर विकासाचा अजेंडा राबवताना कायदेकानून धाब्यावर टाकण्याचे प्रकार घडले. त्याचा फटका आजही धूळखात असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना बसला आहे. शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असताना त्याला राजकीय पाठबळ देण्याचा प्रकार घडला. आरक्षित जागांसह रेडझोन, पूररेषेत बांधकामे झाली. त्यामुळे शहरातील अवैध बांधकामांचा गुंता आजही सुटायला तयार नाही. अजित पवार यांच्या बगलबच्च्यांनी सत्तेचा उन्माद केला. भ्रष्टाचाराचे कुरण वाढल्याने महापालिकेची श्रीमंती हरपली. ‘सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता’ हे समीकरण साधले गेले. अजित पवार यांच्या बगलबच्च्यांनी सत्तेची इतकी सवय लागली की, राष्ट्रवादी विरोधात वारे फिरताच त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. पेराल तेच उगवते याचा प्रत्यय शहरवासियांना आला. अखेर महापालिका निवडणुकीत शहरवासियांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपली चूक दाखवून दिली. मागील वर्षभर राष्ट्रवादी आपल्या पराभवाचे चिंतन करीत आहे. त्यातून राष्ट्रवादी बोध घेईल, अशी अपेक्षा शहरवासियांकडून राष्ट्रवादीच्या द्विदशकी वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.

गटबाजी संपता संपेना!
पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापालिका निवडणुकीत बसला. राष्ट्रवादीचे अनेक मोहरे त्यांच्या समर्थकांसोबत पक्षाबाहेर पडले. त्यामुळे उर्वरीत नेत्यांनी एकत्र येणे अपेक्षित होते; मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांची आजही चार दिशेला तोंडे आहेत. परिणामी प्रबळ विरोधक म्हणूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपली भूमिका महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात बजावता येत नाही. पक्षाचे आंदोलन, कार्यक्रम याकडे बहुसंख्य पदाधिकारी पाठ फिरवतात. त्यातून वेळोवेळी दुहीचे दर्शन घडते. लोकसभा व विधानसभा निवडणूक तोंडावर येऊनही स्थानिक नेत्यांनी बोध घेतला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दादांनी किती दिवस बोट धरायचे?
महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अक्षरशः मरगळ आली होती. ही मरगळ दूर करण्यासाठी कारभारी अजित पवार यांना शहरात यावे लागले. हल्लाबोल आंदोलन छेडत त्यांनी पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. दादांनी सांगितल्याशिवाय स्थानिक नेते कशातही भाग घेत नाहीत. स्वतःहून कोणत्याही बाबतीत पुढाकार घेत नाहीत. दादांचे बोट धरून स्थानिक नेते किती दिवस चालणार, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी स्वतःहून कधी पुढाकार घेणार, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button