breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे: शिवनेरी, शिवशाहीचा प्रवाशांना आधार

 

पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू केलेला संप दोन दिवसांपासून सुरू आहे. संपामुळे राज्यभरातील अनेक डेपोमधून एसटी बसेस बाहेर निघाल्या नाहीत. पुण्यातील स्थानकातून राज्यभरात बसेस जात असल्याने येथेदेखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र, शनिवारी दिवसभरात एसटीच्या 90 टक्के फेऱ्या रद्द झाल्या असून पुणे जिल्ह्यातून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1428 नियोजित फेऱ्यांपैकी केवळ 135 फेऱ्या झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे बाहेगावी जाण्यासाठी लांबच लांब रांगा लावून बसलेल्या प्रवाशांचे हाल झाले.

राज्य शासनाने केलेली वेतनवाढ ही फसवी असल्याचा आरोप करत गुरुवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात अचानक संप सुरू केला. यामुळे राज्यातील अनेक डेपोमधून बसेस बाहेर पडल्या नाहीत. परिणामी बाहेरगावी जाण्यासाठी स्थानकावर गर्दी केलेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. पुणे जिल्ह्यात स्वारगेट, शिवाजीनगर, पुणेस्टेशनसह 13 आगार आहेत. पुण्यातील स्थानकातून प्रवाशांना राज्यभरात जाण्यासाठी बसेस उपलब्ध होतात. यामुळे बरेच आसपासच्या गावांतील नागरिक पुण्यातील स्थानकात आले होते. मात्र, बसेस नसल्याने त्यांनादेखील याठिकाणी येऊन बसावे लागले. एसटीच्या संपात शिवनेरी, शिवशाही सहभागी नसल्याने काही प्रवाशांना या बसेसचा आधार मिळाला. मात्र, या बसेस काही मोजक्‍याच शहरात जात असून अचानक वाढलेल्या प्रवाशांचा बोजा देखील त्यांच्यावर आला. पुण्याहून शनिवारी बोरीवली, दादर, ठाणे याठिकाणी शिवनेरी बस सुरू होत्या तर सांगली, कोल्हापूरला शिवशाही बस सुरू होती. यामुळे काही प्रमाणात नागरिकांना त्याचा फायदा झाला; मात्र, असंख्य नागरिकांची गैरसोय झाली. पुणे जिल्ह्यातून शनिवारी सायंकाळी 6 पर्यंत नियोजित 1428 पैकी फक्त 135 फेऱ्या झाल्या; तर स्वारगेट स्थानकातून 82 पैकी केवळ 8 फेऱ्या झाल्या. यामुळे प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला असून एसटीच्या महसूल उत्पन्नालाही मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांत मिळून जवळपास एक ते सव्वाएक कोटी महसूल बुडाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिवशाहीचाही भोंगळ कारभार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी पुण्यातील स्थानकाबाहेर बसेस गेल्या नाहीत. शिवशाही बसेसचे कर्मचारी संपात सहभागी नसल्याने त्या गाड्या सुरू होत्या. यासाठी आरक्षण केलेले प्रवासी स्वारगेट स्थानकात आले होते. मात्र, शिवशाही कर्मचाऱ्याचाही प्रतिसाद नसल्याचे ज्येष्ठ महिला प्रवासी मिना बर्वे यांनी सांगितले. बर्वे यांनी सांगलीला दुपारी 3.30 ला सांगलीला जाणाऱ्या शिवशाहीचे आरक्षण तिकीट काढले होते. मात्र, तीन वाजले तरीही गाडी कधी येणार, कुठे लागणार यासंबंधी माहिती देण्यात येत नव्हती.

एसटी संपाचा टुरिस्ट गाडी चालकांकडून गैरफायदा

एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा राज्यभरातील प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. या संपाचा गैरफायदा घेऊन खासगी बसेसच्या चालकांनी सर्वसामान्य प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केल्यानंतर खासगी टुरिस्ट गाडी मालकांनीही या प्रवाशांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. या टुरिस्ट गाडी चालकांनी त्यांच्या प्रवासी दरात तब्बल चार ते पाच रुपयांनी वाढ केली आहे; तर लांबपल्ल्यासाठीही अतिरिक्त दरांची आकारणी सुरू केली आहे.

दलालांचीही चांदी…!
शिवाजीनगर, पुणे स्टेशन, स्वारगेट या बसस्थानकांसह संगमवाडी येथील मुख्य थांबा तसेच महामार्गावरील अन्य थांब्यावर प्रवासी मिळावेत यासाठी खासगी बसेसच्या चालकांनी दलांलाची नेमणूक केली आहे. या दलालांना एका प्रवाशाच्या पाठीमागे ठराविक कमिशन ठरवून देण्यात आले आहे. त्यातूनच त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. मात्र, हा संप सुरू होताच या दलालांनीही त्याचा फायदा उठविण्यास सुरुवात केली आहे. हे दलाल प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून बक्कळ कमिशन मिळवत आहेत, त्यातूनच त्यांची चांदी झाली आहे.

डिझेलचे भाव वाढल्यानंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या अन्य वाहनांनी प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. मात्र, टुरिस्ट चालकांनी अशी कोणतीही दरवाढ केली नव्हती. हे वास्तव असताना टुरिस्टच्या गाड्यांच्या चालकांनी केलेली दरवाढ ही योग्यच आहे, प्रवाशांनीही आमच्या अडचणी समजून घेण्याची आवश्‍यकता आहे.
– विनोद कदम, टुरिस्ट गाडी चालक

पुणे जिल्ह्यातून शनिवारी सायंकाळी 6 पर्यंत नियोजित 1428 फेऱ्यापैंकी केवळ 135 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी गरजेनुसार शिवशाही, शिवनेरी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे.
– यामिनी जोशी, पुणे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button