कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा अपघाती मृत्यू

बंगळुरू: कर्नाटकातील काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री सिदुद न्यामगौडा यांचा आज सकाळी कार अपघातात मृत्यू झाला. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ते जामखंडी मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि तीन मुली आहेत.
सिदुद न्यामगौडा हे आज सकाळी गोवा येथून कारने बागलकोटमधील निवासस्थानी परतत होते. त्याचवेळी त्यांच्या कारला तुलसीगिरी येथे एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या न्यामगौडा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, ७० वर्षीय न्यामगौडा हे दिल्लीला गेले होते. तेथून विमानाने ते गोव्याला आले. गोव्याहून ते कारने आपल्या घरी येत होते. त्याचवेळी त्यांच्या कारला तुलसीगिरी येथे अपघात झाला. न्यामगौडा यांनी भाजपचे उमेदवार श्रीकांत सुब्बराव कुलकर्णी यांचा २५००हून अधिक मतांच्या फरकानं पराभव केला होता. त्यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात (१९९०-९१) केंद्रात मंत्रिपद भूषवले होते.