ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही बिघाड नव्हता; मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघातील काल झालेल्या पोटनिवडणुकीत मतदाना दरम्यान ईव्हीएम मशीन खराब झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचे वृत्त मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी फेटाळून लावले आहे. सोमवारी पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड नव्हता. मात्र पहिल्यांदाच वापर करण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट मशीनबाबत काही ठिकाणांहून तक्रारी आल्या होत्या,” असे ओ. पी. रावत म्हणाले.
लोकसभेच्या ४ व विधानसभेच्या १0 अशा १४ जागांसाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले असले, तरी पालघर, गोंदिया-भंडारा व यूपीतील कैराना लोकसभा मतदार संघांत ईव्हीएम (मतदान यंत्रे) बंद पडण्याचे, त्यात गडबड केल्याचे व विरोधी उमेदवारासमोरील बटन दाबले जात नसल्याच्या इतक्या तक्रारी आल्या की, ही यंत्रे म्हणजे भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र, काही यंत्रांमध्ये कडक ऊन आणि धुळीमुळे बिघाड झाल्याचे पालघरच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.