breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिध

पुणे शहराची कोरोना संदर्भातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश दिले होते. आज पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली.

पुणे व पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीत कोविड-19 बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली.

या बैठकीत केंद्रशासनाने मॉल्स व्यतीरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याअनुषंगाने राज्य शासनस्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.

क्वारंटाईन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटल किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांची अथवा खाजगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्ट खाली जिल्हाधिकारी यांना अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी.

रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतीरिक्त 55 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या दोन महिन्यात 8 वा, 9 वा आणि 10 वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे,असे आदेश त्यांनी दिले.

पुणे महापालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्याकरिता वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी सामाजिक अंतराचे पालन होऊन, परिणामी कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल.

ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार किंवा अस्थमाचा आजार असेल ,अशा नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी. त्यांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. अशावेळी कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या संपर्कात आल्यास आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तो टाळावा, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांच्या राहण्याच्या अडचणीबाबत पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत उपलब्ध केलेल्या जागेत राहण्यासाठी जाता येईल,असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button