breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी विधानसभा मतदारसंघात पाण्याची कृत्रिम टंचाई

– पाणी पुरवठा कर्मचा-यांना हाताशी धरुन होतेय राजकारण
– अनेक भागात पाणी कमी प्रमाणात सोडून नागरिकांना दिला जातोय त्रास
पिंपरी –  भोसरी विधानसभा मतदारसंघातील जाधववाडी, चिखली, कुदळवाडी यासह अनेक भागात महापालिकेच्या पाणी पुरवठा कर्मचा-यांना हाताशी धरुन पाण्याचे राजकारण होवू लागले आहे. अनेक भागात पाणी कमी-अधिक प्रमाणात सोडून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यात येवू लागली आहे. मतदारांना त्रास देवून त्यानंतर स्वर्चातून टॅंकर पाठवून लोकप्रतिनिधी मतदाराची सहानभुती मिळवू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाण्यातही राजकारण करुन मतदारांना महापालिकेच्याच टॅंकरचे पाणी देवून लोकनायक बनण्याचा प्रयत्न काही  जनसेवक करु लागले आहेत, असा आरोप मनसेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष राहूल जाधव यांनी केला.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने सर्वत्र सम प्रमाणात पाणी सोडावे, पाण्यासाठी नागरिकांना वेठीस धरु नये, पाणी सोडणा-या कर्मचा-यासह अधिका-यांची चाैकशी करुन त्याच्यावर कारवाईची मागणी जाधव यांनी केली.  त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात दुष्काळी अस्मानी संकट ओढावले आहे. सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणातही 15 जुलैअखेर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. महापालिकेने पाणी पुरवठा दिवसाआड केला. तसेच नागरिकही पाण्याचा काटकसरीने वापर करुन बचत करीत आहेत. पाणी बचतीसाठी महापालिका देखील जनजागृती करीत आहे.
अनेक प्रभागात पाण्याचे राजकारण सुरु आहे. कमी – अधिक पाणी सोडून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चार वर्षात पाणी प्रश्नासह विकास कामे करता आली नाहीत. मात्र, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टॅंकर पुरवठा करण्यासाठी लोकप्रतिनिधी सर्वत्र धावू लागले आहेत. पालिका कर्मचा-यांना मतदारसंघातील पुर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भागात पाणी पुरवठा हा आठवड्यातून एक-दोन वेळा अर्धा व्हाॅल्व सोडण्यात येतो. पाणी पुरवठा कमी झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होतो.  पाणी कमी आल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढतात. लोक नगरसेवकांकडे गा-हाणे मांडायला जातात. त्यानंतर नगरसेवक हे अधिका-यांना फोन करुन पाण्याची विचारणा करतात. नागरिकांचे समाधान करुन उद्या पाणी सुरळीत येईल, आता तुमच्याकडे टॅंकर पाठवून देतो, असे सांगून त्यांना शांत केले जात आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्तांनी सदरील कृत्रिम पाणी टंचाईची चाैकशी करुन नागरिकांना होणा-या त्रासापासून मुक्तता करावी, तसेच पाणी कमी सोडणा-या कर्मचारी व अधिका-यावर कारवाई करावी, अशी मागणी राहूल जाधव यांनी केली आहे.
मतदारांच्या सहानभूतीसाठी लोकप्रतिनिधीचा खटाटोप
अनेकदा पाण्यावरून नागरिकांमध्ये भांडणे होवून त्याचा वाद विकोला जातो. काही लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते काय घडले, यावर लक्ष ठेऊन असतात. वाद झालाय म्हटल्यावर, लोक रस्त्यावर उतरले म्हटल्यावर कार्यकर्ते नेत्याला फोन करतात. लोकप्रतिनिधी दोन-चार बगलबच्चे घेवून भांडण मिटवण्यास येतात. त्यातील एक कार्यकर्ता हळूच फोटो काढून प्रभागातील पाणी प्रश्न सोडवताना दादा, भाऊ, काका अशा उपध्या सोशल माध्यमातून टाकतात. पाण्यासाठी लोकांना पाण्याचा टॅंकर मागवून भांडू नका, तुम्हाला पाणी कमी पडू देणार नाही, असा विश्वास हे नेते द्यायला विसरत नाहीत. लगेच कार्यकर्ते प्रभागात अफवा पसरवून दादा, भाऊ, काका यांनी स्वःखर्चातून टॅंकर पाठवून दिल्याचे चर्चा घडवून आणली जात आहे. विशेषता अनेक लोकप्रतिनिधी महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवरुन पिण्याचे पाणी टॅंकरमधून मागवितात. स्वता मतदाराची सहानभूती मिळवण्याचा खटाटोप करु लागले आहे.
पाण्याचा टॅंकरचा धंदा मांडलाय
भोसरी विधानसभा मतदारसंघात अनेक भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. त्या पाणी टंचाईमुळे लोकप्रतिनिधींनी पाण्याच्या टॅंकरचा धंदा मांडला आहे. एका प्रभागात दररोज चार ते पाच पाण्याचे टॅंकर भरुन पाठविले जात आहेत. साधारणपणे वापरायचे पाण्याचा टॅंकर 500 रुपये आणि पिण्याच्या पाण्याचा टॅंकर 1 हजार रुपये दिला जात आहे. रोजचे दीड हजार रुपये खर्च पकडला तर एका प्रभागात चार टॅंकरचे सुमारे 6 हजार रुपये होतात. एका महिन्याचे तब्बल 1 लाख 80 हजार रुपये होत आहेत. त्यामुळे हे लोकप्रतिनिधी पदरमोड करुन खरंच जनतेला पाणी देतात की महापालिकेचे पाणी घेवून जनतेला आम्ही स्वःखर्चाने पाणी दिल्याचे भासविले जात आहे. तसेच सामाविष्ठ गावासह अनेक भागात बांधकाम साईट सुरु आहेत. त्या बांधकामाना देखील महापालिकेचे पाणी वापरले जात आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button