breaking-newsपुणेमहाराष्ट्र

गरजू मुलांसाठी नवे कपडे शिवण्याच्या उपक्रमाची दशकपूर्ती!

पुणे : सुवासिक तेल, सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान, नवे कपडे, कुटुंबीयांसमवेत फराळ आणि गोडधोड पदार्थाचे भोजन करून सारे जण दिवाळीचा आनंद लुटतात. पण, अनेक मुलांच्या नशिबी हे भाग्य नसते. अशा अनाथ मुलांसाठी नवे कपडे शिवण्याचे काम वयाच्या पंचाहत्तरी पार केलेल्या सुषमा गोडबोले गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत. या उपक्रमाची दशकपूर्ती साजरी करताना त्यांनी शिवलेले २६० नवीन कपडे यंदा नाशिक जिल्ह्य़ातील एकल विद्यालयातील मुलांसाठी पाठवण्यात आले आहेत.

आपले मन रमवण्यासाठी माणसाला छंद आवश्यक असतो. पण, आपल्या छंदाचा उपयोग समाजातील गरजूंच्या भल्यासाठी झाला तर जीवनामध्ये किती आनंद मिळतो याची प्रचिती सुषमा गोडबोले यांना आली आहे. शिवणकामाच्या छंदातून अनाथ मुलांसाठी नवे कपडे शिवण्याचा उपक्रम त्या गेली नऊ वर्षे करत आहेत. अनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये मुलांसाठी नवीन कपडे शिवून देण्याचे काम त्या आनंदाने करीत असून वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतर त्यांनी आपल्यातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली आहे.

आपण सणाला नवे कपडे परिधान करतो, मग गरजूंना नवीन कपडे का देऊ नयेत, असा विचार मला सुचला. पहिल्या वर्षीच्या दिवाळीला मी नवीन कपडे शिवून स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केले. अनाथ मुलांना दिवाळीमध्ये नवे कपडे घालता यावेत म्हणून मी स्वत: शिवलेले कपडे संस्थेत दिल्यानंतर नवे कपडे परिधान केलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद हीच माझी दिवाळी, अशी भावना सुषमा गोडबोले यांनी व्यक्त केली. पुढे दरवर्षी नव्या कपडय़ांचा आकडा वाढतच गेला.

हुजुरपागेतून शिवणाचे शिक्षण घेतल्यानंतर मुलींचे कपडे शिवण्यापुरतीच माझी कला होती. मात्र, त्याला आता वेगळे परिमाण लाभले याचे समाधान वाटते, असे गोडबोले यांनी सांगितले.

यंदा आमच्या परिसरातील ८८ वर्षांच्या नातू आजी यांनी मला १५ स्वेटर विणून दिले. मी शिवलेल्या कपडय़ांबरोबर स्वेटरही पाठविण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

नव्या वर्षांला सुरुवात

दिवाळीपूर्वी नवे कपडे स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केल्यानंतर मी दोन महिने सुटी घेते. नव्या वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच एक जानेवारी रोजी पुढील वर्षीच्या दिवाळीच्या कामाचा श्रीगणेशा करते. त्यामुळे मला पुरेसा वेळ मिळतो, असे गोडबोले यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button