breaking-newsआरोग्यपुणेमहाराष्ट्र

स्त्रीआरोग्यविषयक जागृतीत पुरुषांचा सहभाग लक्षणीय

आज मासिक पाळी स्वच्छता जनजागृती दिवस

पुणे : मासिक पाळीबाबत बोलणे भारतात आजही फारसे समाजमान्य नसले, तरी मासिक पाळी विषयक जनजागृतीत पुरुषांचा सहभाग महिलांपेक्षा लक्षणीय आहे. जनजागृतीच्या कामात सहभाग घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण तब्बल ऐंशी टक्के असून त्या तुलनेत महिलांचे काम हे वरवरचे असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेणारी पूजा ढेरिंगे ही विद्यार्थिनी ‘मासिक पाळीचे सामाजिक आणि आर्थिक संदर्भ’ या विषयावर अभ्यास करत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांशी ती नियमित संवाद साधते. तसेच या विषयाशी संबंधित काही सर्वेक्षणही तिने केले आहे. त्यातून समोर आलेली निरीक्षणे मांडणारा एक प्रबंधही तिने तयार केला आहे. २८ मे हा मासिक पाळी स्वच्छता जनजागृती दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मासिक पाळी आणि स्वच्छता, दिव्यांग महिलांची मासिक पाळी, मासिक पाळीबाबतचे समज-गैरसमज यांबाबत संशोधनातून दिसून आलेली निरीक्षणे याची माहिती पूजा ढेरिंगे हिने दिली.

ती म्हणाली,की मासिक पाळी या विषयावर समाज माध्यमांवर मोकळेपणाने चर्चा होताना दिसते, प्रत्यक्षात मात्र त्यावर चर्चा कमी होते. एवढेच नव्हे तर मुलगी किंवा महिला त्याबाबत बोलत असेल तर त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया नेहमीच सकारात्मक नसतात, म्हणून सर्वेक्षण करून याबाबत वस्तुस्थिती तपासावी असे वाटले. त्यातूनच सॅनिटरी पॅड्सचा वापर – आरोग्य व व्यवहार हा विषय निवडला. त्यासाठी विविध वयोगटातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिला, पुरुष आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी संवाद साधून मासिक पाळी जनजागृती, गैरसमज यांबाबत त्यांची मते जाणून घेतली. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे, तसेच अपंग महिला व मुलींची मासिक पाळी सुसह्य़ करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे दिसून आले. समाज माध्यमांत मासिक पाळी या विषयावर होणारी निकोप चर्चा हा सकारात्मक बदल असल्याचे ती म्हणाली.

योग्य विल्हेवाटीसाठी

* सॅनिटरी पॅड विक्रेत्यांनी त्याच्या विल्हेवाटीसाठी पाकिट पुरवावे.

* सॅनिटरी पॅड कचरा उचलण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षित साधने द्यावीत.

* सॅनिटरी पॅडच्या संपूर्ण विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर बसवावेत.

सुसह्य़ मासिकपाळीसाठी

* ग्रामीण, आदिवासी भागात जनजागृती आवश्यक.

* सॅनिटरी नॅपकिन, कप, कापडी पॅड, टँपोन वापराबाबत जनजागृती आवश्यक.

* दिव्यांग महिला, मुलींसाठी मापाचे कस्टमाईज पॅड बनवणे आवश्यक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button